मुख्य बातमी

‘एनसीपीए’ आणि खल्वायन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जानेवारीमध्ये संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट सेंटर (एनसीपीए) आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्‍वात गेली २८ वर्षे सातत्याने संगीत आणि नाट्यक्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या खल्वायन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरात प्रथमच तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीच्या वातानुकुलीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान संगीत नाट्य महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, कार्यवाह प्रदीप तेंडुलकर व खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी आज (१३ डिसेंबर) सकाळी पत्रकार परिषदेत दिली.

‘एनसीपीए’ ही भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेले हे दक्षिण आशियातील पहिले बहुशैलीचे सांस्कृतिक केंद्र आहे. ‘एनसीपीए’ संस्था संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, साहित्य आणि फोटोग्राफी या क्षेत्रातील भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तेच विविध शैलीतील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांव्दारे आणि नवीन आणि नाविन्यपूर्ण कार्यसादर करण्यासाठी वचनबध्द आहे. जेआरडी टाटा आणि प्रसिद्ध अणुभौतिक शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे बंधू डॉ. जमशेद भाभा या दोन महान द्रष्ट्यांनी मोठ्या दूरदृष्टीने आणि काळाची गरज ओळखून या संस्थेची स्थापना केली. दरवर्षी ७००हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन ही संस्था करीत असल्याने भारतातील हे सर्वात मोठे आणि सर्वांगिण असे परफॉर्मिंग आर्ट सेंटर बनले आहे.

खल्वायन या संस्थेची स्थापना ऑक्टोबर १९९७ मध्ये विजयादशमीच्या मुहुर्तावर झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताची व संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी व पुढे नेण्यासाठी गेली २८ वर्षे मासिक संगीत सभा, गुढीपाडवा, दिवाळी पाडवा विशेष संगीत सभा, संगीत मार्गदर्शन शिबीरे तसेच १५ जुन्या, नव्या गद्य व संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करुन संस्थेने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे.

पत्रकार परिषदेत डावीकडून मनोहर जोशी, प्रदीप तेंडुलकर आणि श्रीनिवास जोशी

पत्रकार परिषदेत माहिती देताना कार्यवाह श्री. तेंडुलकर म्हणाले, दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवराच्या हस्ते होणार आहे. या दिवशी ५९ व्या राज्य नाट्य महोत्सवात १० वैयक्तिक पारितोषिकांसहीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या “संगीत ताजमहाल” या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. मुंबईचे प्रसिध्द हार्मोनियम वादक व संगीतकार डॉ. विद्याधर ओक यांनी लिहिलेले व संगीत दिलेले हे नाटक एका ऐतिहासिक सत्याच्या पार्श्‍वभूमीवरील नवे कोरे संगीत नाटक आहे. देखणे नेपथ्य, बहारदार गायकी, भरजरी वेशभूषा, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावसंगीत आणि कर्नाटक संगीतातील नवीन रागावर आधारीत नव्या चालीच्या मधुर नाट्यपदांनी हे नाटक नटलेले आहे.

दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीचे प्रसिध्द कादंबरीकार आणि नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले आणि ६२ व्या राज्य नाट्य महोत्सवात ८ वैयक्तिक पारितोषिकांसहीत तृतीय क्रमांक मिळविलेल्या “संगीत अमृतवेल” या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून सामाजिक विषमतेच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांनी आपले आयुष्य वेचले, त्या महान विभूतींमध्ये संत चोखामेळा यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करतांना त्यांनी लिहिलेले अभंग, त्यांनी सोसलेल्या यातना आणि विठ्ठलावरची अतूट निष्ठा यातून त्यांची सामाजिक एकतेसंदर्भातील अमृतवेलीसारखे योगदान, त्यांचे नाट्यमय जीवन चरित्र या नाटकातून मांडले आहे. फिरते नेपथ्य, बहारदार गायकी असलेल्या नव्या चालीच्या सुमधूर नाट्यपदांनी हे नाटक नटलेले आहे.

दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कै. प्रा. वसंत कानेटकर यांचे सुप्रसिध्द संगीत नाटक “संगीत मत्स्यगंधा” या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. महाभारतातील कथाभागातील एक पान सत्यवती आणि भीष्म यांच्यातील संघर्ष. खल्वायनच्या ज्येष्ठ कलावंतांचा कसदार अभिनय, नवीन तरुण तडफदार कलावंतांच्या गायकीतून सादर होणारी “देवाघरचे ज्ञात कुणाला”, “गुंतता र्‍हदय हे”, “नको विसरू संकेत मिलनाचा”, “गर्द सभोती रान साजणी” यासारख्या सुमधूर पदांनी हे नाटक नटलेले आहे.

तीनही संगीत नाटकांचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले आहे. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, देवगड, मुंबई, बीड, पुणे येथील प्रसिध्द कलावंतांबरोबरच सावनी पाटेकर, सावनी शेवडे, श्रेयस व्यास, लक्ष्मीप्रसाद पटवारी हे प्रसिध्द तरुण कलावंत भूमिका करणार आहेत. या नाटकांच्या सीझन तिकीटाचे दर ७५० रुपये, ५०० रुपये आणि २५० रुपये असे असून ३० डिसेंबरपासून दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ८ या वेळेत सीझन तिकीटांची आगावू विक्री सुरू होणार आहे. Unbox its my show अ‍ॅपवर सीझन तिकीटे उपलब्ध आहेत. दैनंदिन तिकीट दर ३०० रुपये, २०० रुपये आणि १०० रुपये असे असून त्याची विक्री नाटयगृहावर प्रयोगाचे दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू असेल.

रत्नागिरी व परिसरातील संगीत नाट्य रसिकांना हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी आहे. या महोत्सवातील नाटकांचा आस्वाद सर्व संगीत रसिकांनी घ्यावा, असे आवाहन ‘एनसीपीए’ आणि खल्वायन संस्थांनी केले आहे.

खल्वायनविषयी थोडक्यात

गेली २७ वर्षे रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात खल्वायन संस्था सातत्याने कार्यरत आहे. दर महिन्याला होणारी मासिक संगीत सभा (आजपर्यंत ३०५), दरवर्षी दिवाळी पाडवा व गुढीपाडवा या दिवशी होणार्‍या विशेष संगीत सभा (आजपर्यंत ५०), संगीत प्रशिक्षण शिबीरे, नव्या जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती (आजपर्यत १५) इत्यादी कार्यक्रमाव्दारे संस्थेचे कार्य सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button