मुख्य बातमी

जिंदल कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश : आमदार उदय सामंत

रत्नागिरी : सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना नसताना देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतलेच का? कंपनीचा निष्काळजीपणा या गॅस गळतीला कारणीभूत असून याप्रकरणी तहसीलदारांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आज (१३ डिसेंबर) आमदार सामंत यांनी जिल्हा रुग्णालयात बाधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता ६९ वर पोहोचल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

काल (१२ डिसेंबर) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास जिंदल कंपनीच्या एका प्लांटने देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. याचवेळी मोठ्या प्रमाणात वायूगळती झाली आणि हा वायू परिसरात पसरला. नजिकच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या वायूगळतीची बाधा झाली. मिळेल त्या वाहनातून विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. आज आमदार सामंत हे रत्नागिरीत दाखल झाले. त्यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले.

सध्या ६८ मुले व एक महिला असे मिळून ६९ वायुगळतीचे बाधित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची वॉर्डमध्ये जाऊन त्यांनी विचारपूस केली. तसेच जोपर्यंत मुले पूर्णपणे बरी होत नाहीत तोपर्यंत त्यांना डिस्चार्ज देऊ नका, अशा सूचना आ. सामंत यांनी केल्या.

जिल्हा रुग्णालयात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, कंपनीचे अधिकारी यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत आमदार सामंत यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांची भंबेरी उडवली. ग्रामस्थांनीदेखील कंपनीच्या कारभाराचा पाढाच वाचला. त्यानंतर आ. सामंत कमालीचे संतापले आणि कंपनीच्या अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार सामंत यांनी सांगितले की, कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे. याची सखोल चौकशी व्हावी यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत डीवायएसपी, प्रांत अधिकारी, बंदर अधिकारी, पर्यावरण विभागाचे अधिकारी आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यावेळी हा प्रकल्प जयगडमध्ये आला त्यावेळी परिसरात अनेक विकासकामे करण्याचे आश्‍वासन कंपनीने दिले होते. या परिसरात सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे आश्‍वासन कंपनीने दिले होते. मात्र हे हॉस्पिटल आहे कुठे? कंपनीने आश्‍वासन न पाळल्यामुळेच आज विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना रत्नागिरीत हलवण्याची वेळ आली. कंपनीने दिलेली आश्वासन आणि त्याची परिपूर्णता याचा अहवाल देखील समितीने द्यावा, असे आ. सामंत यांनी सांगितले.

या प्रकरणात कंपनीच जबाबदार आहे, असे वारंवार सांगत आमदार सामंत पुढे म्हणाले की, ग्रामस्थांचा कोणताही गैरफायदा या कंपनीने उठवू नये, या बाधित मुलांना नुकसानभरपाई दिलीच पाहिजे आणि थोडीथोडकी नव्हे तर भविष्यातला धोका डोळ्यासमोर ठेवून ही मदत व्हायला हवी. आज एवढी मोठी दुर्घटना घडली. यापूर्वी अपघातदेखील घडले; मात्र कंपनीचे मालक पुढे आले नाहीत. त्यांनी पुढे यायला पाहिजे, स्थानिक जनतेशी संवाद साधला पाहिजे, या प्रकरणात कंपनी दोषी आहे.त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखला झालाच पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले.

वायू दुर्घटना प्रकरणात रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना पोलीस स्थानकात तक्रार देण्याचे आदेश दिले असल्याचे सांगून या तक्रारीनंतर पोलीस रितसर गुन्हा दाखल करून घेतील. पोलिसांचा तपास आणि चौकशी समितीचे अहवाल यातून जो काही निष्कर्ष पुढे येईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button