ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे गेल्या तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शरद पवार यांनी सकाळी भेट दिली होती. त्यानंतर अजित पवार दुपारी भेट घेण्यासाठी आलेत. यावेळी बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएममधील घोटाळा, निवडणुकीमध्ये पैशांचा वापर, विनोद तावडे पैसे वाटप प्रकरण आणि अदानी प्रकरणावरून दादांसमोरच सरकारचे वाभाडे काढले. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाण साधला.
महाराष्ट्राच्या १९५२ पासून आजतागयत जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यापैकी या निवडणुकीमध्ये पैशांचा धुमाकूळ झाला. सरकारच्या तिजोरीमधून बहिणींनी पैसे देण्यात आले. हा जो प्रकार आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला झालेल्या मतदानामध्ये एवढा बदल का झाला? मला मतदान करताना वाटले होते की काहीतरी गडबड आहे. बटेंगे तो कटेंगेचे नारे देण्यात आले. यावेळेला ज्या प्रकारचं सरकारी वर्णन दिसले ते भयंकर आहे. त्यामुळे मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला, कारण मला वेदना झाल्या. अदानी हा फॅक्टर दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकरणाचाही तपास व्हायला पाहिजे. माझ्यासारख्या सुजाण नागरिकाला हे खुपत नाही. केंद्र सरकार लोकशाही हा प्रकार जुमानत नाही. पार्लमेंटमध्ये हजर राहायचे नाही आणि चर्चाही होऊ द्यायची नाही आणि पत्रकारांसोबत बोलायचे नाही. तिकडे विदेशातील लोकांनी सल्ला द्यायचा तो तर भाग वेगळा असल्याचे म्हणत बाबा आढाव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला गेला पाहिजे. तो छडा सरकार लावू देणार नाही. हातातील सत्ता कोण सोडणार आहे, त्यासाठी जनतेमध्ये गेले पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही इथे आलो आणि लोकं याची दखल घेत आहेत. याचे निराकारण झाले पाहिचे, त्यांनी दाबायचा प्रकरण केला तरी जमणार नाही. माझ्यासारखी माणसे प्रसंगी मरण पत्करतील पण हा जाच सहन करणार नाही. बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य फुकट दिले नाही, त्यासाठी लढावे लागले. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना सांगितले चले जाव, करेंगे या मरेगें, मग इंग्रजांनी म्हणाले नाही की हे सांगणारे तुम्ही कोण? त्यांनी थट्टा नाही केली. माझ्या प्रश्नांचे निराकरण झाले नाहीतर मी महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गाने चालणार. दगड उचलणार नाही, मला याआधी अटक झाली आहे, पण सत्याग्रहात झालीये. मी एक दोन नाहीतर ५२ वेळा तुरूंगात गेलोय. माझे म्हणणे आहे की जो मार्ग मी आयुष्यात उचलला तो जनतेला सांगेल, असेही बाबा आढाव म्हणाले.



