मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तविधानसभा निवडणूक २०२४

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलिसांचे पथसंचलन

संगमेश्वर : तालुक्यात विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संगमेश्वर पोलीस व सीआयएसएफच्या जवानांनी संगमेश्वर शहर व बाजारपेठेतून पथसंचलन केले.

संगमेश्वर पोलीस व सीआयएसएफ जवानांच्या वतीने पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आदर्श आचारसंहितेचा सर्वानी पालन करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये अशा सूचनाही पोलीस प्रशासनाने यावेळी दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून पोलिसांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरही करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांच्या पथसंचलनास संगमेश्वर एसटी स्टँडपासून सुरुवात करण्यात आली. संगमेश्वर बाजारपेठ, रामपेठ, मापारी मोहल्ला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असे पथसंचलन करण्यात आले. यात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे २ अधिकारी, ६ अंमलदार, सीआयएसएफ १ अधिकारी आणि ४७ अंमलदार सहभागी होते.

आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन

संगमेश्वर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावातील समाज माध्यमांवर पोलीस प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष असून व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाज माध्यमांवरील पोस्टची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. एखाद्या पोस्टमधून कायदा व्यवस्था बिघडली, तर ऍडमिनलादेखील जबाबदार ठेवले जाईल याची दखल घ्यावी, असे आवाहन संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी यावेळी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button