रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ९४२ जणांचे टपाली मतदान
निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस अशा ९४२ जणांनी काल (१२ नोव्हेंबर) टपाली मतदान करून आपला हक्क बजावला. आजही (१३ नोव्हेंबर) टपाली मतदान या केंद्रावर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
शहरातील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.१५, दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर हे टपाली मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीसांनी केले. एकूण १ हजार ५६७ पैकी काल पहिल्या दिवशी ९४२ जणांनी आपले मतदान केले. आजही याच ठिकाणी टपाली मतदान होणार आहे. यामध्ये दापोलीमधील ७१, गुहागरमधील ६६, चिपळूणमधील ८८, राजापूरमधील ७३ आणि इतर जिल्ह्यातील १७१ अशा एकूण ९४२ जणांना समावेश आहे.
भव्य सेल्फी पॉईंट खास आकर्षण
दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर भव्य असा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याठिकाणी मतदान करून आल्यानंतर मोठ्या संख्येने एकमेकांची सेल्फी काढण्यात मतदार गुंतले होते. या फलकावर ‘जागृत नागरिक होऊ या.. अभिमानाने मत देऊ या, जागृत मतदार..सशक्त लोकशाहीची ताकद, अशी विविध जनजागृती करणारी घोषवाक्ये आकर्षित करत होती. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देसाई, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मतदारांसाठी मार्गदर्शन करत होते. या केंद्रावर पिण्याची पाण्याची सोय, आरोग्याची सोय त्याचबरोबर टपाली मतदानाचा मोठा सूचना फलक लक्ष वेधून घेत होता.



