मुख्य बातमी

कार्तिकी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपुरात भक्तांचा महापूर

बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त मंगळवारी (१२ नोव्हेंबर) भाविकांचा भक्तीचा मळा फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी यावर्षी अलोट गर्दी केली होती. रामआळी, मारुती आळी, गोखले नाका आदी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. गर्दीने मागील उच्चांक मोडीत निघाला.

प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्ह्याभरातून भाविकांनी दर्शन व यात्रेच्या खरेदीला भाविकांची मोठी गर्दी केली होती. रत्नागिरीत अतिशय भक्तीभावात, उत्साहात कार्तिकी एकादशी उत्सव पार पडला. एकादशीनिमित्त मंदिरातील वातावरण टाळ-मृदुगांच्या, विठ्ठल रखुमाईच्या नामगजराने भक्तीपूर्ण होऊन गेले होते. श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींना अलंकारांनी सजवण्यात आले. पहाटे विधीवत पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले होते. याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे काकड आरती पहाटे चार वाजता, त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिराच्या सभामंडपात अनेक मंडळांनी दिवसभर भजन सादर करून विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली.

यात्रेनिमित्त स्थानिक व्यावसायिकांसह बाहेरून आलेल्या अनेक व्यावसायिकांनी हजेरी लावली. कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येपासून बाजारपेठेत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दोन दिवस चाललेल्या या यात्रेत कोट्यावधींची उलाढाल झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button