Uncategorized

प्रथमेश गावणकर, परशुराम कदम यांचा शिवसेनेत प्रवेश 

रत्नागिरी : जिजाऊ संघटनेचे रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर तसेच ठाकरे शिवसेनेने नव्याने युवा सेना जिल्हायुवा अधिकारी पदी नियुक्त केलेले जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी काल (३० ऑक्टोबर) घेतलेल्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये दिली.

गावणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात जिजाऊच्या माध्यमातून प्रथमेश गावणकर यांनी मोठे सामाजिक संघटन उभे केले आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊन गावणकर यांनी हा निर्णय घेतला आहे. एका धडाडीच्या कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेणं हे माझं काम आहे त्यामुळेच प्रथमेश यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी नेमणूक केल्याचे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ना. सामंत पुढे म्हणाले की, बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांची रात्री बारा वाजता मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर आम्हीदेखील स्थानिकांसोबत उभे राहू, येत्या २ दिवसांत रिफायनरी विरोधकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली.

परशुराम कदम यांनीही काल शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची युवा सेना कोकण विस्तारक पदी त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सांगितले केले. उदय सामंत यांच्या माध्यमातूनच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. काही काळ आपण त्यांच्यापासून दूर होतो. परंतु मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सामंत यांना साथ देण्याचा निर्णय माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांनी घेतला असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. तर आपण ज्या पक्षांमध्ये होतो, त्या पक्षांमध्ये निष्ठावंतांना डावलण्यात येत आहे. उदय बने माझे ज्येष्ठ सहकारी होते. त्यांचा विधानसभा उमेदवारीवर हक्क होता. परंतु त्यांना डावलण्यात झाल्याने आपणही नाराज झाल्याचे कदम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button