रत्नागिरीतील उमेदवारही विधानसभेत धगधगती मशाल घेऊन जाणार : आमदार राजन साळवी
बाळ माने आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार

रत्नागिरी : कोकण आणि शिवसेना यांचं वेगळं नातं आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय. शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर ती प्रथम कोकणात वाढली, नंतर ते महाराष्ट्रात वाढली. म्हणून कोकणातील कोणतेही निवडणूक असू देत त्यात कोकणवासीयांनी शिवसेनेला नेहमीच भरभरून दिले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही आमचा उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धगधगती मशाल घेऊन विधानसभेत जाणार, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार लांजा-राजापूर मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.
विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने हे आपला उमेदवारी अर्ज आज (२८ ऑक्टोबर) भरणार आहेत. त्यानिमित्त आमदार राजन साळवी रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत माजी शहरप्रमुख प्रमोद शेरे उपस्थित होते.
आमदार साळवी म्हणाले, उदय बलांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे इच्छुक असणे गैर नाही. मागील निवडणुकीचा विचार करता ज्यावेळी शिवसेना-भाजप युती तुटली, त्यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी ही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेने उदय सामंत यांना स्वीकारले आणि ४० हजारांच्या फरकाने निवडून दिले होते याचा अर्थ या मतदारसंघात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व आहे.
शिवसेनेच्या प्रवाहामध्ये येताना शिवसेनेचा पसारा वाढला पाहिजे, शिवसेनेची उन्नती झाली पाहिजे त्यासाठी विविध पक्षातून विविध ठिकाणहून माणसे घेतली जातात. त्याच पद्धतीने इथली शिवसेना मजबूत करण्याच्या दृष्टीने बाळ माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उदय बने हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आतापर्यंतच्या काळात उदय बनेंना शिवसेनेने जे काही दिले आहे, ते भरभरून दिले आहे. तसेच बनेंनीही शिवसेनेसाठी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे भविष्यातील काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उदय बनेंचा नक्की सन्मान करतील, असा विश्वास यावेळी आमदार साळवी यांनी व्यक्त केला.



