Uncategorizedमुख्य बातमी

झाडावर अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

रत्नागिरी : भालावली (ता. राजापूर) येथे पांडुरंग गणेश केळकर यांच्या मालकीच्या जागेत आंब्याच्या झाडावर २० फूट अंतरावर तारेमध्ये अडकलेल्या बिबट्याची वन विभागाच्या वतीने सुखरूप सुटका करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी : भालावली येथे श्री. केळकर यांच्या मालकी जागेत आंब्याच्या झाडावर २० फूट अंतरावर तारेमध्ये बिबट्या अडकल्याची माहिती अमोल नार्वेकर यांनी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी २.१० वाजता राजापूर येथील परिमंडळ वन अधिकारी यांना दूरध्वनी वरून दिली. या घटनेची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना देऊन त्यांच्यासमवेत रत्नागिरीतील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे, कोल्हापूर येथील वन्यजीव पशुवैद्यक व पशुशल्य चिकित्सक डॉ. संतोष भिकाजी वाळवेकर, कोल्हापूर येथील वनपाल अमित कुंभार, तेजश कांबळे तसेच राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तारेच्या फासकित अडकलेल्या बिबट्या हा आंब्याच्या झाडावर साधारण २० ते २५ फुट उंचावर सकाळपासून अडकलेल्या स्थितीत असल्याचा अंदाज आला. त्यानंतर या बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी ट्रक्युलाईन गनचा वापर करून रेस्कु करण्यासारखी जागेवरील परिस्थिती नसल्याने व बिबट्या सुस्थितीत असल्याचे पशुधन विकास अधिकारी, वन्यजीव पशुवैद्य व पशुशल्य शल्यचिकित्सक तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी खात्री केली व रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान रेस्कु टीमचे श्री. शिंदे वनरक्षक यांचे मदतीने बिबट्यास अडकलेली तार कट करताच काही सेकंदात बिबट्या नैसर्गिकरीत्या अधिवासात निघून गेला.

हा बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे एक ते दीड वर्ष आहे. ही रेस्कुची कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीमती प्रियांका लगड, यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

या कामगिरीसाठी वनक्षेत्रपाल (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल (राजापूर) जयराम बावदाणे, वनपाल (पाली) न्हानु गावडे , वनपाल (लांजा) सारीक फकीर, वनरक्षक (रत्नागिरी) श्री. प्रभू साबणे, वनरक्षक (जाकादेवी) श्रीमती शर्वरी कदम, वनरक्षक (राजापूर) विक्रम कुंभार, वनरक्षक (कोर्ले) श्रावणी पवार, वनरक्षक (गुहागर) श्री. शिंदे, वनरक्षक (चिपळूण) राहुल गुंठे व रेस्क्यू टीमचे महेश धोत्रे, श्री. तांबोळी, विजय म्हादये, दीपक म्हादये, नितेश गुरव, नीलेश म्हादये उपस्थित होते.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने चिपळूण, रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button