रत्नागिरीत राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन साजरा

रत्नागिरी : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमार्फत आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत २१ ऑक्टोबर रोजी झाडगाव येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत लोकमान्य टिळक विद्यामंदिर, नगर परिषद शाळा क्र. २ येथे राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभार, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झाडगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, पर्यवेक्षक बिराजदार, आरोग्य सहाय्यक प्रमोद लिंगायत, शैलेश वाघाटे, मुख्याध्यापक काझी तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याबाबत व जनजागृतीबाबत शपथ घेतली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी आयोडीनचे महत्त्व व आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. शाळेच्या हॉलमध्ये आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाबाबत रांगोळी स्पर्धा व पोस्टर पेंटिंग स्पर्धा आयोजित करून प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये उत्कृष्ट असणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.



