आरोग्य विभागाच्या कायाकल्प पुरस्कारात रत्नागिरी जिल्ह्याची छाप
जिल्ह्यात १०३ शासकीय आरोग्य संस्थाना कायाकल्प पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२३-२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्यातील २ उपजिल्हा रुग्णालय, २ ग्रामीण रुग्णालयासह २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ७६ आरोग्य उपकेंद्रानी हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने १५ मे २०१५ रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’चा विस्तार म्हणून ‘कायाकल्प पुरस्कार योजना’ सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण पद्धती सुधारणे आणि आरोग्य सुविधांना प्रोत्साहन देणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य संस्थांचे मोठे जाळे असून त्या माध्यमातून ग्रामीण जनतेला विशेषतः गरीब व जोखमीच्या लोकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते.
या योजनेचे काही प्रमुख उद्दिष्ट्ये : लोक/कर्मचारी सहभागातून शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ व सुसज्ज करणे, राज्य शासनाच्या रुग्णालयातून गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देऊन त्याद्वारे जनतेचा शासनाच्या आरोग्य संस्थांवरील विश्वास वाढविणे व सर्व सार्वजनिक आरोग्य सेवेकडे सर्वांना आकर्षित करणे, शासकिय आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सेवेची गुणवत्ता व परिणामकारकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, रुग्णांचे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाधान करणे, शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे (Institutional Deliveries) प्रमाण वाढविणे, शासकिय आरोग्य संस्थांमधील बाह्य रुग्ण व आंतरुग्णांची संख्या वाढविणे, शासकीय आरोग्य संस्थांमधील सेवा देणाऱ्या (Service Provider) कर्मचाऱ्यांच्या मानसिक दृष्टीकोनात सकारात्मक (Positive) बदल घडवून आणणे, रुग्णाच्या तपासणीसाठी व आजारांच्या अचूक निदानासाठी प्रयोगशाळांची गुणवत्ता वाढविणे, पोलीस स्टेशन असलेल्या ठिकाणी शवविच्छेदनाची सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे.



