मुख्य बातमीराजकीय

साड्या वाटप करणारे कोरोना, चक्रिवादळांच्या काळात होते कुठे?

आमदार भास्कर जाधव यांचा सवाल : पुणे येथे आयोजित गुहागरवासियांच्या मेळाव्याला प्रतिसाद

गुहागर : निवडणूक आल्यामुळे भाजपची मंडळी आज गावागावात जावून जावून महिलांना साड्या वाटप करत आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटकाळात, त्याचबरोबर निसर्ग, तौक्ते यासारख्या चक्रिवादळाच्या काळात ही मंडळी होती कुठे, असा सवाल शिवसेना नेते, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघातील पुणेकरांच्या मेळाव्यात काढले. माझी पत्नी २००७ पासून हळदी कुंकवाच्या निमित्ताने दरवर्षी गावोगावी जाते आणि हजारो महिलांपर्यंत वाण पोहोचवते, असे उद्गारही त्यांनी काढले.

पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गुहागर मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा पुण्यातील चांदणी लाॅन्स येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यातील हजारोंच्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात लोकांना औषधे, धान्य पुरविण्यापासून मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना गावात घेतले पाहिजे यासाठी प्रबोधन करण्यापर्यंतचे काम आम्ही केले. वेगवेगळ्या चक्रिवादळांच्या काळात नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम आम्ही केले. त्यावेळी सध्या साडीवाटप करणारी भाजपची मंडळी घरात बसलेली होती, अशी घणाघाती टीका आमदार श्री. जाधव यांनी केली. याच भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या अडीच वर्षांत विकासकामांना रुपयाचा निधी दिला नाही, उलट आधीचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेल्या विकासकामांवर स्थगिती आणली. आपण उच्च न्यायालयात संघर्ष करून ही स्थगिती उठवली, असे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा केवळ गवगवा आहे. राज्यात ६ कोटी ५३ लाख महिलांपैकी केवळ १ कोटी १३ लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ५ कोटी ४० लाख महिला या योजनेपासून वंचित आहेत, हे वास्तव समोर आणले.

या मेळाव्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आपल्या भाषणाने सर्वांचे मन जिंकले. विक्रांतचे भाषण ऐकून आपण मंत्रमुग्ध झालो, असे उद्गार मेळाव्याला उपस्थित माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी काढले. आमदार श्री. जाधव यांनी मंत्रिपदाच्या काळात केलेले प्रचंड काम, विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंना मिळवून दिलेला लाभ, संकटकाळात धावून जावून केलेली मदत याची आठवण करून दिली. याचे उत्तर मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला द्यावे लागेल, असे सांगताना ते म्हणाले, आमदार जाधव हे जरूर आक्रमक आहेत. पण ते कधीही कुणाच्या मुलींविषयी, महिलांविषयी बोलत नाहीत आणि त्यांच्यावर गेल्या ३५ वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही.

शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरपुडे, महानगरपालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, गुहागर संपर्क प्रमुख प्रकाश महाडिक, निवृत्त जिल्हाधिकारी मधुसुदन साळवी, महिला संघटिका सविता मते, वैभव वाघ, जत तालुका संपर्कप्रमुख प्रेरणा तटकरे, गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी सभापती विभावरी मुळे, तालुका सचिव महेश गोवळकर, नुरभाई दळवी आदी यावेळी व्यासपीठावर होते. विनायक मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मेळावा यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button