रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन मेम्बर्सची लोहपुरुष स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
कोल्हापूर येथे आयोजन; आरती दामले यांचा पोडियम फिनिश

रत्नागिरी : कोल्हापूर येथे २२ सप्टेंबर रोजी झालेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित KSC- लोहपुरुष ट्रायथलॉन आणि ड्युओथलॉन स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये ९ जणांनी सहभाग दर्शवत आपल्या कामगिरीने स्पर्धेवर छाप सोडली.
कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये १० किमीचे पेसिंग करण्याच्या निमित्ताने रेग्युलर रनिंग सुरू करणाऱ्या आरती दामले, या रत्नागिरी जिल्ह्यामधून या स्पर्धेत सहभागी होऊन जिंकणाऱ्या पहिल्या महिला ट्रायथलीट ठरल्या आहेत. आरती दामले यांनी त्यांच्या वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कोकण कोस्टल मॅरेथॉन टीमच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला.
विनायक पावसकर, अमित कवितके आणि यतिन धुरत यांनी यशस्वीरित्या हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण केली. डॉ. नितीन सनगर, आरती दामले यांनी यशस्वीरित्या ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण केली. डॉ. राज कवडे यांनी ऑलिम्पिक डिस्टन्स ड्युऑथलॉनमध्ये अप्रतिम फिनिश केला. तसेच चंद्रशेखर शिंदे आणि श्रीलेश शिंदे यांनी स्प्रिंट ड्युऑथलॉन मध्ये सुंदर कामगिरी केली. मयूर देसाई यांनी ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण करण्याचा चांगला प्रयत्न केला.
सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या रेग्युलर सायकल राईड, कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रॅक्टिस रन यामुळे ट्रायथलॉन करण्याची प्रेरणा मिळाली. कधीही मी आयुष्यात धावेन असे वाटले नव्हते. पण कोकण कोस्टल मॅरेथॉन पूर्ण केल्यामुळे एक आत्मविश्वास मिळाला, असे यावेळी आरती दामले म्हणाल्या.
विनायक पावसकर यांनी याच महिन्यात सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेशात पूर्ण केली होती. त्यांनी हाल्फ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्यावर डॉ. नितीन सनगर यांचे विशेष आभार मानले. डॉ. नितीन यांनी स्वत: यशस्वी स्पर्धा पूर्ण करतानाच सहभागी स्पर्धकांची डाएट तसेच स्पर्धेआधीची मानसिक तयारी सुद्धा करून घेतली असे यावेळी श्री. विनायक पावसकर म्हणाले.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील सकारात्मक आणि प्रोत्साहनपर वातावरणाचा फायदा झाला, असे यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांनी सांगितले. चिपळूण येथील अहमदली शेख यांनी सुद्द्धा हाफ आयर्नमॅन स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत अप्रतिम पद्धतीने स्पर्धा पूर्ण केली.
गेल्या दोन वर्षांत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून शहर आणि आजूबाजूच्या परिसरात विविध सायकलविषयक उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यामुळे सायकल संस्कृती वाढायला मदत झाली आहे. मागील वर्षीपासून या सायकलिंगला कोकण कोस्टल मॅरेथॉनची जोड मिळाली आहे आणि कोकणवासीय या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून सायकलिंग आणि रनिंग कडे वळले आहेत आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले आहेत.
ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉनचे स्वरूप हे ६ तासांत १.५ किमी पोहणे, ४० किमी सायकल चालवणे आणि १० किमी धावणे असे आहे. हाफ आयर्नमॅन ट्रायथलॉनचे स्वरूप १० तासांत १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१ किमी धावणे असे आहे. जगप्रसिद्ध अशा कस लावणाऱ्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व सहभागी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन मेम्बर्सचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



