वेळणेश्वरमध्ये दहा दिवसांच्या गणपतींचे भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन
ग्रामपंचायतीने प्रथमच विसर्जन ठिकाणी केली साऊंड सिस्टीमची व्यवस्था : नवनिर्वाचित सरपंच नितीन पोळेकर यांचा उपक्रम

गुहागर : तालुक्यात दहा दिवसांच्या गणपतींचे काल (१७ सप्टेंबर) वाजतगाजत, ढोल-ताशे, भजन यांच्या साथीने वेळणेश्वर येथील समुद्र किनारी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी किनाऱ्यावर तुफान गर्दी उसळली होती.
या वेळी तरुण मंडळींनी समुद्रकिनारी जाखडी नृत्याचा आनंद घेतला. त्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर एक-एक गणपती विसर्जनासाठी पाण्यामध्ये नेण्यात आले. यावर्षी प्रथमच ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वरचे नवनिर्वाचित सरपंच नितीन पोळेकर यांच्या संकल्पनेतून वेळणेश्वर समुद्रकिनारी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली होती.
समुद्रामध्ये उतरताना लाईफ जॅकेटचा वापर करा, कमरेला दोरी बांधून मगच पाण्यामध्ये उतरा, अशा प्रकारच्या सूचना ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेशभक्तांना करत होते. वेळणेश्वर ग्रामपंचायतीने केलेला हा नवीन उपक्रम कुतुहलाचा विषय बनला होता. त्यामुळे विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडला. हे कार्य नवनिर्वाचित सरपंच नितीन पोळेकर यांच्या संकल्पनेतून या वर्षीपासून सुरू करण्यात आले. अनेकांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.



