संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयाचा निर्माल्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम

संगमेश्वर : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनाचे औचित्य साधून संगमेश्वर बाजारपेठ येथे निर्माल्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम राबविला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, प्राध्यापकांनी गणेश विसर्जनादरम्यान आणले जाणारे निर्माल्य नदीत न टाकता त्याचे स्वतंत्रपणे संकलन करण्याचे नियोजन केले.
संगमेश्वर शहर, परिसरात सर्वधर्मीय समाज सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर एकमेकांसोबत घट्ट जोडले गेलेले आहेतच, तर ते एकमेकांच्या संस्कृतीचा आणि सामाजिक सणांचा अविभाज्य भाग आहे. विसर्जनाचेवेळी निर्माल्य संकलनात आपले योगदान देणे याला फार महत्त्व आहे हे सामाजिक भान जपण्याचे काम महाविद्यालयाच्या प्राचार्य संजना चव्हाण आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक यांनी ज्या कल्पकतेने राबविले ते अधिक महत्त्वाचा सलोख्याचा संदेश देणारे आहे.
गणेशविसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात फुले, हार, फळे, दुर्वा आणि अन्य साहित्य विसर्जित केले जाते. यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नदीकिनारी विसर्जित केलेले निर्माल्य जमा होते आणि ते बऱ्याच वेळा अनेकांकडून पायदळी तुडविले जाते. तसेच कचऱ्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. पाणी दूषित होऊ नये या उद्देशाने निर्माल्य संकलन उपक्रम राबविला जात आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य पाण्यात न टाकता या संकलन केंद्रावर जमा करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
याप्रसंगी विसर्जनासाठी आलेले सर्व भक्तगणांनी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माल्य विद्यार्थ्यांच्या हाती देऊन संकलित केले आहे. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनासाठी आलेल्या काही भक्तगणांशी संवाद साधला. तसेच निर्माल्य नदीत टाकून प्रदूषण करण्यापेक्षा जमा करावे आणि त्याच्यापासून खत निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे अनेक भक्त गणांनी सहकार्य केले.
निर्माल्य संकलनच्या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख अनिल नेमण, तेजस्विनी सावंत आणि प्रा. दीपक भोसले उपस्थित होते.



