
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनाचे औचित्य साधून शहरातील मांडवी बंदर येथे निर्माल्य संकलनाचा एक स्तुत्य उपक्रम राबविला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, प्राध्यापकांनी गणेश विसर्जनादरम्यान आणले जाणारे निर्माल्य समुद्रात न टाकता त्याचे स्वतंत्रपणे संकलन करण्याचे नियोजन केले. या नियोजनात मुस्लिम महिला आणि विद्यार्थीनी यांना सहभागी करत परस्परातील सलोख्याचे आगळी अनुभूती दिली.
रत्नागिरी शहर, परिसर आणि जिल्हा हे सर्व जात-धर्म पंथांचे एक विलक्षण मिश्रण आहे. हे ऋणानुबंध गेल्या अनेक शतकांचे आहे. येथील हिंदू- मुस्लिम समाज सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर एकमेकांसोबत घट्ट जोडले गेलेले आहेतच, तर ते एकमेकांच्या संस्कृतीचा आणि सामाजिक सणांचा अविभाज्य भाग आहे. येथील हातीसच्या हुरुसाचे मानकरीच आहेत नागवेकर कुटुंबीय. अशा हजारो घटना आहेत. येथील मुस्लिम समाजातील पाटणकर, मोडक, सावंत, साखरकर ही नावे ही या संमिश्र संस्कृतीचे द्योतक आहे.
उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या कार्यअहवाल प्रकाशनानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी या सामाजिक एकात्मता आणि एकरूपता यांचा विशेष उल्लेख करत रत्नागिरींकरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सृजनतेला विशेष दाद दिली होती. हा भाईचारा आणि सामाजिक सहकाराची शांतता काही घटकांना अस्वस्थ करते त्यातून काही भडक मांडणीकरत तरुणाईला उचकावण्याचा प्रयत्न होतो; मात्र येथील संयमी नेतृत्व आणि समाज ते होऊ देणार नाही.
या पार्श्वभूमीवर मुस्लिम विद्यार्थीनी यांनी स्वत:हुन पुढाकार घेत मांडवी समुद्रावर विसर्जनाचेवेळी निर्माल्य संकलनात आपले योगदान देणे याला फार महत्व आहे.
हे सामाजिक भान जपण्याचे आणि ते वृद्धिंगत करण्याचे काम एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा जगदाळे आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक यांनी ज्या कल्पकतेने राबविले ते अधिक महत्त्वाचा सलोख्याचा संदेश देणारे आहे.
गणेशविसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात फुले, हार, फळे, दुर्वा आणि अन्य साहित्य विसर्जित केले जाते. यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये समुद्रामध्ये विसर्जित केलेले निर्माल्य जमा होते आणि ते बऱ्याच वेळा अनेकांकडून पायदळी तुडविले जाते. तसेच कचऱ्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. पाणी दूषित होऊ नये या उद्देशाने निर्माल्य संकलन उपक्रम गेली १० वर्ष राबविण्यात येत आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य पाण्यात न टाकता या संकलन केंद्रावर जमा करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
याप्रसंगी विसर्जनासाठी आलेले सर्व भक्तगणांनी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माल्य विद्यार्थ्यांच्या हाती देऊन संकलित केले आहे. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनासाठी आलेल्या काही भक्तगणांशी संवाद साधला. यावेळी काही भक्तगण म्हणू लागले की गणरायाचे निर्माल्य हे पाण्यातच विसर्जित केले पाहिजे, तर काही भक्तगण निर्माल्य पाण्यात न टाकता ते एकत्र गोळा केले पाहिजे असे मत व्यक्त केले.



