मुख्य बातमीशैक्षणिक

नवनिर्माण हाय’मध्ये उकडीचे मोदक बनविण्याची स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज पालकांसाठी उकडीचे मोदक बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकांनी नवनवीन कल्पना लढवून नाविन्यपूर्ण मोदक तयार केले होते.

यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, शाळेतील सर्व शिक्षिका, शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेचे एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या शेफ मेघना शेलार आणि प्रा. अथर्व खांडेकर यांनी केले.

स्पर्धेत सुगंधा अलकुंटे यांनी प्रथम, अंजली सावंत यांनी द्वितीय आणि सिया चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्वरा कुळ्ये यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. याबरोबरच बेस्ट इनोव्हेशनचे बक्षीस कीर्ती माणगावकर, तर बेस्ट डेकोरेशनचे प्रिया मनोरकर यांना देण्यात आले.

याप्रसंगी संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये आणि परीक्षक शेफ मेघना शेलार यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेफ मेघना यांनी मोदक बनवणे ही एक कला असून, मोदकाची उकड कशी काढता यावर ती मुख्यत्वे अवलंबून असल्याचे नमूद करतानाच मोदकाच्या त्याच्या पाऱ्या किती जाड, बारीक यावर त्याची सुबकता अवलंबून असल्याचे सांगितले. मोदकाची उकड, तयार केलेले सारण, मोदक करताना त्याच्या काढलेल्या पाऱ्या, मांडणीची पद्धत, सजावट, नाविन्य अशा निकषांवर या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्वांनीच काहीतरी वेगळे देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता, असे त्या म्हणाल्या.

संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी नवनिर्माण हायतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांत पालकांनाही सहभागी करून घ्यावे या हेतूने ही स्पर्धा घेतल्याचे सांगितले.

दरम्यान, या स्पर्धेत अनेक वेगवेगळ्या संकल्पना वापरून स्पर्धकांनी परीक्षकांपुढे आव्हान निर्माण केले होते. नेहमीच्या उकडीच्या मोदकांबरोबरच पान मोदक, गुलकंद मोदक, गाजर – बीट रूट वापरून तयार केलेले मोदक, आंबा मोदक हे फ्लेवर असलेले मोदक परीक्षकांसह उपस्थितांच्याही पसंतीस उतरले. उकड पीठाचा मोदक आणि त्यालाच जोडून तयार केलेले गणपती बाप्पा हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. अनेक पालकांनी नऊवारी साडी नेसून आणि नथ घालून पारंपरिक वेशभूषेत स्पर्धेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button