मुख्य बातमी
रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने समुद्राला नारळ अर्पण

रत्नागिरी : बा समुद्रा… शांत हो… सर्वांचे रक्षण कर असे आवाहन करत रत्नागिरीत आज (१९ ऑगस्ट) नारळी पौर्णिमा उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस दलाकडून मानाचा नारळ समुद्राला अर्पण करत समुद्राला शांत होण्याचे आणि सर्वांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. शहरातील मांडवी किनारी पोलीस दलाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पूजा करून पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.
यावेळी शहर पोलीस ठाण्यातील, पोलीस मुख्यालयातील पोलीस बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मच्छिमार आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समुद्राला नारळ अर्पण केला.



