संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयातर्फे रक्षाबंधन उत्साहात
संगमेश्वर पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय आणि बास स्थानकात बांधल्या राख्या; "एनएसएस"च्या वतीने आयोजन

संगमेश्वर : येथील नवनिर्माण महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने संगमेश्वर पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय आणि संगमेश्वर बस स्थानक येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात झाला.
संगमेश्वर बस स्थानकामध्ये आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस भरतीविषयक सायबर क्राईम तसेच पोलीस कामकाजाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, सचिन कामेरकर, आव्हाड, मुजावर, पंदेरे आदी पोलीस उपस्थित होते. प्रा. अनिल नेमण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिसांना विद्यार्थ्यांनी राखी बांधून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. तसेच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात डॉ. धामणे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून उत्सव साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे संगमेश्वर बस स्थानकामध्ये काम करणारे राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी यांनाही विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. तसेच नवनिर्माण पब्लिक स्कूल नर्सिंग महाविद्यालय आणि महाविद्यालयात हा उत्सव साजरा करण्यात आला.



