मुख्य बातमी

“त्या” रेशनिंग दुकानदाराची चौकशी करण्याचे आमदार भास्कर जाधवांचे आदेश

गुहागर : गुहागरची आमसभा गुहागर भंडारी भवन येथे आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. यावेळी गावातील ग्रामस्थांनी रेशनिंग दुकानदाराच्या व्यथा मांडल्या. ‘तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला रेशनिंग चालू करून देतो’, असे तळवली येथील रेशनिंग दुकानदार ग्रामस्थांना सांगत असतो. यासंदर्भात त्या रेशन दुकानदाराची योग्य पद्धतीने चौकशी करण्याचे आदेश आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या आमसभेला संपूर्ण गुहागर तालुक्यातून ९० अर्ज आले होते. प्रारंभी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविल्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद आदर्श शाळा वाढदईला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षाचा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच तीन लाखांचे बक्षीसही मिळाले आहे. या शाळेला या सभेदरम्यान आमदार जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, विद्यमान सरपंच नितीन पोळेकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष विनायक कांबळे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जोशी, शाळेचे मुख्याध्यापक डोईफोडे उपस्थित होते.

या आमसभेमध्ये सरकारच्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला. गुहागर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा असा ठरावही यावेळी करण्यात आला. गुहागर तालुक्यात एमआयडीसी आली पाहिजे, असे अनेकांनी मत व्यक्त केले. तालुक्यात आलेली एमआयडीसी ज्यांनी घालवली त्या महायुती सरकारचा निषेधही करण्यात आला. हेदवी मधील एका कुटुंबातील ९ जणे अपघातात गेली त्यांना मदतीचा हात मिळावा अशी शासनाकडे मागणी करूनही जाणीवपूर्वक मदत दिली गेली नाही. त्याबाबतही निषेध नोंदवण्यात आला. शृंगारतळीतील मिनी आयटीआय गुहागर जांगळेवाडी येथील शाळेमध्ये नेण्यात आले. येथील शिक्षकांना तब्बल ८ महिने पगार मिळालेला नाही, त्याबाबतही खंत व्यक्त केली.

अंजनवेल ग्रामपंचायत क्षेत्रातील जलजीवन मिशनचा ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेला. त्याला ७० टक्के पेमेंट अदा केले आहे. याबाबत आमदार जाधव यांनी पहिल्यापासूनच आवाज उठविला आहे. ते म्हणाले, या योजनेचे वाटोळे लावले आहे. ज्यांची बाजारात २० हजार रुपयांची वस्तू घेण्याची क्षमता नाही त्यांना ५० ते १०० कोटींची कामे दिली आहेत. या ठेकेदारांनी त्यांच्या कामामध्ये पोट ठेकेदार नेमले आहेत. त्यांना याबाबत काही माहिती नाही. एकूणच गावागावातील पाणी योजनेचे वाटोळे लागले आहे.

धोपावे रस्ता मे महिन्यात झाला. दोन महिन्यातच या रस्त्याला खड्डे पडले यावर आमदार जाधव यांनी अधिकाऱ्यांना सबंधित ठेकेदारांवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले. तवसाळ रस्ता खराब झाल्याने येथे एसटी बंद आहे. मात्र संबंधित खात्याकडे तात्काळ निधी नसल्याने मी आमदार निधीतून निधी देतो, त्वरित रस्ता करा, अनेक ठिकाणी पाण्यासाठी रस्ते खोदले जातात. संबधित खात्याची परवानगी घेतली जात नाही. केबलही रस्त्याच्या साईडला तीन मीटर बाहेरून गेली पाहिजे अन्यथा कारवाई करा, सार्वजनिक ठिकाणी उनाड गुरे आली तर गुरांच्या मालकांना शोधा व कारवाई करा, असे आदेश आमदार जाधव यांनी दिले.

आमसभेला विद्यार्थ्यांचे सत्कार केले; मात्र गचाळ नियोजनाचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी सर्वांनाच पहायला मिळाला. यावर आमदार जाधव यांनी शिक्षण विभागाला खडसावले. शृंगारतळी येथे बांगड्या विकणाऱ्या महिलांना त्वरित व्यवसाय करण्यासाठी चबुतरा द्यावयाचा आहे, तो त्वरित गणपतीपूर्वी बांधून द्यावा, असे आदेश दिले. बाजारपेठेमध्ये मोठी पिकअप शेड बांधून द्यावी, या ठिकाणी अडथळा आल्यास पोलिसांनी सहकार्य करावे. शृंगारतळी रिक्षा थांबा येथील संघटनेचे सत्यप्रकाश चव्हाण व दीपक रहाटे यांनी थांब्याबाबत चौकशी केली असता शृंगारतळीमध्ये तीन रिक्षा थांबा मंजूर आहेत, तेही बोर्ड त्वरित लावावेत, असे सांगितले. तालुक्यातील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली टेंडर घेतले जातात; मात्र दुरुस्ती होत नाही, झाडेही तोडली जात नाही यावरील नाराजी व्यक्त करण्यात आली

या आमसभेला विक्रांत जाधव, माजी जि. प. सदस्य प्रवीण ओक, महेश नाटेकर, नेत्रा ठाकूर, सचिन बाईत, विनायक मुळे, पद्मा शेठ आरेकर यांसह माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध विकास संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नीलेश गोयथळे, सोनाली वरंडे, अर्पिता सुर्वे, श्रावणी नागे, सानिका गोंधळी, प्रसन्ना जागकर यांचे अभिनंदन करण्यात आले, तर योगिता खाडे हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button