मुख्य बातमी

जगात तिरंगा शोभून दिसावा, असे काम करावे : पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

एक धाव सुरक्षेची; मिनी मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन संबंधित जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आज मिनी मॅरेथॉन काढण्यात आली. गोगटेजोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी छात्र, गृहरक्षक दल, आपदा मित्र, पोलीस, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. निळ्या आकाशात, जगात आपला राष्ट्रध्वज तिरंगा शोभून दिसला पाहिजे, अशा पध्दतीने सर्वांनी काम केले पाहिजे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मॅरेथॉनच्या सांगता प्रसंगी केले.

येथील पोलीस मैदानावरून सुरुवात झालेल्या मिनी मॅरेथॉनला पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहाय्यक आयुक्त अभयसिंह शिंदे-इनामदार आदी उपस्थित होते. पोलीस बँड पथकाने यावेळी देशभक्तीपर धून वाजविली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत ही रॅली शासकीय विश्रामगृह चौक मार्गे जयस्तंभ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आली. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या विविध सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यात आली. स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करण्यात आल्या. मॅरेथॉनमधील विजेते विक्रांत किजले, युवराज गावडे आणि श्रवण पाटील या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, निळ्या आकाशात संपूर्ण जगात आपला राष्ट्रध्वज तिरंगा शोभून दिसला पाहिजे, अशा पध्दतीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे. आरोग्याच्यादृष्टीने व्यायाम, जीम, धावणे या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. हा आरोग्याचा संदेश आपणा सर्वांना द्यावयाचा आहे. असे सांगून स्वातंत्र्य दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तिरंगा रॅलीत सर्वांनी उत्साहात सहभाग नोंदविल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, येथे असणाऱ्या सेल्फी पॉईंटवर सर्वांनी फोटो काढून तिरंगा डॉट कॉमवर अपलोड करावेत आणि प्रशस्तीपत्र मिळवावे. प्रांताधिकारी श्री. देसाई यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button