संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयात १२ ऑगस्टला रानभाज्या महोत्सव व रानभाज्या पाककृती स्पर्धा

संगमेश्वर : नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यावतीने १२ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सव व रानभाज्या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रानभाज्यांची ओळख आणि यांच्या उपयुक्ततेसाठी माहिती पुढील पिढीला व्हावी आणि त्यांचे संवर्धन व्हावे याहेतूने हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. पावसाळ्यात आपल्या आसपासच्या परिसरात रानभाज्या उपलब्ध होत असतात. या सर्व रानभाज्या वेगवेगळ्या चवीच्या तसेच वेगवेगळे औषधी गुणधर्मांनी युक्त असतात. यातील काही भाज्या ज्ञात असतात. मात्र अनेक रानभाज्यांविषयी काही माहिती नसते. काही वेळा या भाज्या चुकीच्या पद्धतीने बनवल्या जातात. त्यामुळे अनेकजण याचा आहारात वापर करताना दिसत नाहीत. नवीन पिढीला भाज्यांचे गुणधर्म व त्यांचे संवर्धन यांची प्रेरणा मिळावी या हेतूने हा रानभाज्या महोत्सव आयोजित केला आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. संगमेश्वर जवळच्या बचत गटातील महिला यामध्ये सहभागी होणार असून, प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.



