दापोली कृषी विद्यापीठात रॅगिंगचा प्रकार उघडकीस
पिडीत विद्यार्थ्याची तक्रार; रॅगिंग झाल्याचे निश्चित झाल्यास रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील ३ विद्यार्थ्यांनी शारिरीक व मानसिक छळ करून रॅगिंग केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.
दापोली कोकण कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे प्रत्यक्ष शिक्षण शेतात घेता यावे, यासाठी त्यांना साडेचार महिने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांकडे पाठविले जाते. विविध गावात राहून हे विद्यार्थी शेतीचे धडे घेत असतात, तसेच शेतकऱ्यांना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देतात. अशाच ११ विद्यार्थ्यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका गावात कार्यरत होता. त्यातील एका विद्यार्थाला याच गटातील अन्य ३ सहकारी विद्यार्थी त्रास देत होते; मात्र या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्याने या त्रासाबाबत त्यांना माहिती दिली नाही. त्याच्या या ३ सहकारी मित्रांनी या गावात प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर तिसऱ्या दिवसापासून या मुलाला शारिरीक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
त्यामध्ये अन्य सहकारी मित्रांसमोर अंतर्वस्त्रावर नाचायला त्याचा व्हिडीओ तयार करणे, रात्री उंट होण्यास सांगत, असे या विद्यार्थ्याने सांगितले आहे. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती त्यात सदस्य म्हणून रावे कार्यक्रम प्रमुख डॉ. आनंद मयेकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जीवन आरेकर, सहाय्यक कुलसचिव आर. एस. गुजर यांचा समावेश आहे. या समितीने सर्व ११ विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली व मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोघांना रत्नागिरी जिल्ह्यातील एका तालुक्यात, तर अन्य एकाला रायगड मध्ये दुसऱ्या केंद्रावर पाठवण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
पहिल्या समितीने रॅगिंगसंदर्भात अहवाल दिल्यास दुसऱ्या समितीची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांसह पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, तहसीलदार यांचाही समावेश असेल. त्यामध्ये रॅगिंग झाल्याचे अंतिमत निश्चित झाल्यानंतर रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.



