मालगुंड येथे केशवसुत स्मारकात १० ऑगस्ट रोजी ‘श्रावणधारा मनामनातील’ कार्यक्रम

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे ‘श्रावणधारा मना मनातील’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
गोमांतकीय साहित्यिकांच्या सहभागाने सजलेली रत्नागिरीकर आणि गोमांतकीय साहित्यिकांची संयुक्त मैफिल या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या बहारदार मैफिलीत साहित्य लेणी तिळगाव गोवाचे प्रकाश क्षीरसागर, पोर्णिमा केरकर, आसावरी कुलकर्णी, नंदिनी कुलकर्णी, मेघना कुरुंदवाडकर, सुनीता फडणवीस, किरण कामत, अपूर्वा ग्रामोपाध्ये, दयाताई मीत्रगोत्री, शर्मिला भाटे आदी कवी आपल्या मैफिलीचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर रत्नागिरीचे देविदास पाटील, सुनेत्रा जोशी, शुभम कदम, उमा जोशी, अमेय धोपटकर अरुण मोर्ये हे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नलिनी खेर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती आणि कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखा यांचे वतीने प्रतिवर्षी ‘श्रावणधारा मनामनातील’ हा कार्यक्रम खास श्रावण महिन्यात आयोजित केला जातो. त्याचबरोबर या महिन्यात इतरही प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केले जातात.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी रत्नागिरी आणि मालगुंड परिसरातील काव्यरसिक आणि कवी साहित्यिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांनी केले आहे.



