३ ऑगस्टला आमदार नीतेश राणे गुहागरमध्ये
तालुका प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी अधिवेशनाचे आयोजन

भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) उत्तर रत्नागिरीच्या ५ तालुक्यांचे प्रमुख आणि ३८० पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अधिवेशन ३ ऑगस्टला पाटपन्हाळे येथील श्री पूजा हॉलमध्ये सकाळी १० वाजता होणार आहे. या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून आमदार नीतेश राणे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी आज (१ ऑगस्ट) दिली.
शृंगारतळी येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, पदाधिकारी दिनेश बागकर, संगम मोरे, मंगेश रांगळे, हरीश वेल्हाळ उपस्थित होते. राज्यात एकूण ७८ जिल्हे आणि ७७८ मंडळ आहेत. या प्रत्येक मंडळामध्ये असे भाजपचे अधिवेशन होणार असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. दरम्यान, २०२४ ला गुहागरमध्ये भाजपचाच आमदार असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



