मुख्य बातमीशैक्षणिक

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात “महिला अत्याचार आणि कायदे”वर मार्गदर्शन 

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने “महिला अत्याचार आणि कायदे” याविषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. अमित शिरगावकर, समुपदेशन पांडुरंग नंदिवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. टेमकर यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. सोनिया मापुस्कर उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. शिरगावकर यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यांवर नजर टाकली. अनेक कायदे महिलांसाठी अनुकूल असून, महिलांमध्येच यासंदर्भात माहितीचा अभाव आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले. एखादी घटना मिटविण्यासाठी अनेक कायद्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचेही नमूद केले. १८ वर्षांवरील महिलेवरही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असे सांगून जामीन न मिळणारे गुन्हे, कौटुंबिक गुन्हेगारी, कौटुंबिक हिंसाचार कायदा २०१५, वाहन विषयक कायदे, पोस्को ॲक्ट २०१५ यांविषयी मुद्देसूद माहिती दिली.

समुपदेशक श्री. नंदिवले यांनी आजच्या घडीला अत्त्याचार हे स्री आणि पुरुषांवर दोघांवरही होत असल्याने दोघांसाठीही समान कायदे असल्याचे सांगितले. समाज माध्यमाचा काळजीपूर्वक वापर करण्याचा सल्ला देतानाच विद्यार्थी जीवनात असतानाच आपले ध्येय निश्चित करा आणि कुणाशीही गैरवर्तन करू नका असा सल्ला त्यांनी दिला. सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. टेमकर यांनी अपघात होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक वय हे १६ ते २४ असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. अंमली पदार्थ टाळा तसेच व्यसनाधीनता कमी करा, असा सल्ला देतानाच मदतीसाठी ११२ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी केला. सूत्र संचालन प्रा. निकिता नलावडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button