मुख्य बातमीसाहित्य-कला

कलेचा आनंद लुटा : ज्येष्ठ हार्मोनियम वादक शिरीष आचरेकर

"स्वरनिनाद"चा गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : “आपण जे वाद्य शिकतोय त्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती हवी, गाणे ऐकणे हा उत्तम रियाज आहे, जे शिकाल त्याचा रियाज आवश्यक आहे आणि मानधन हा मुख्य हेतू कधीही ठेवू नका, कलेचा आनंद लुटा,” असे आवाहन विनायकबुवा रानडे यांचे शिष्य आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक शिरीष आचरेकर यांनी केले.

येथील स्वरनिनाद अकॅडमीच्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रम रविवारी (२८ जुलै) स्वा. सावरकर नाट्यगृहात झाला. त्यावेळी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ गुरु आणि गायिका सौ. विनया परब, प्रसिद्ध तबलावादक आणि गुरु हेरंब जोगळेकर, स्वरनिनाद संगीत विद्यालयाचे विजय रानडे, गुरु केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, सौ. प्रज्ञा काळे, गुरु चैतन्य पटवर्धन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता गणपतीच्या पूजनाने आणि नटराज देवतेला वंदन करून झाली.

सुरुवातीला हार्मोनियम वादन ग्रुप १ मधील विद्यार्थ्यांनी त्रितालात राग भूपाली सादर केला. त्यानंतर केशवा माधवा, देहाची तिजोरी, अचुतं केशवम ही भक्तिगीते सादर केली. ग्रुप २ मधील विद्यार्थ्यांनी यमन कल्याण गत राग (त्रिताल) सादर करून शुक्रतारा मंदवारा, सखी मंद झाल्या, चांदणे शिंपीत जाशी ही भावगीते सादर केली. ग्रुप ३ मधील विद्यार्थ्यांनी त्रितालात मधुकंस गत राग सादर करतानाच नमन नटवरा, देवाघरचे ज्ञात कुणाला, जय शंकरा, मुरलीधर श्याम ही नाट्यगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

गुरु चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) यांच्या विद्यार्थ्यांनी किरवणी आणि दिल की तापीश हा राग, तर गुरु सौ. प्रज्ञा काळे यांच्या विद्यार्थ्यांनी त्रितालात राग भूपाली सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर गुरु मंगेश चव्हाण यांच्या विद्यार्थ्यांनी पखवाज वादन करून कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तर गुरु केदार यांच्या प्रारंभिक ते विशारद पूर्ण केलेल्या ८७ विद्यार्थ्यांनी तबला वादन करून यावर कळस चढवला.

गुरु केदार लिंगायत यांच्या तबला वादन ग्रुप १ पहिली आणि दुसरी परीक्षा दिलेल्या तब्बल ४२ लहान विद्यार्थ्यांनी सामूहिक तबला वादन करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. ग्रुप २ मधील तिसरी आणि चौथी परीक्षा दिलेल्या २४ विद्यार्थ्यांनी तसेच ग्रुप ३ मधील चौथी आणि पाचवी परीक्षा दिलेल्या १९ विद्यार्थ्यांनी त्रिताल सादर केला. ग्रुप ४ मधील उपांत्य विशारद ग्रुपमधील ६ विद्यार्थ्यांनी ताल पंचम सवारी सादर केला, तर ग्रुप ५ मधील विशारद झालेल्या ५ विद्यार्थ्यांनी ताल आडाचौतालचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

दरम्यान, गुरु केदार लिंगायत यांचे विद्यार्थी श्री. पाटील यांनी श्री. लिंगायत यांना गुरुपौर्णिमेनिमित्त भेट दिलेल्या वर्ग वहीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button