राजापूर शहरातील पूर ओसरला; पावसाचा जोर कायम

राजापूर : शहरातील पुराचे पाणी सोमवारी (२२ जुलै) सकाळनंतर ओसरले असले, तरी अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. अर्जुना नदीही इशारा पातळीच्या असल्याने राजापूरकरांवर पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे. गेले दोन दिवस आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या राजापूर शहरातील व्यापाऱ्यांचा सोमवारचा दिवसही चिखल काढण्यात व साफसफाईत गेल्याने दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली.
शनिवारपासून संततधारेने पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच रविवारी पावसाने आणखीनच बरसायला सुरुवात केल्याने अर्जुना व कोदवली नद्यांचे पुराचे पाणी शहरात घुसले होते. पुराच्या पाण्यात वीज वितरण कंपणीचे अनेक ट्रांसफॉर्मरही पाण्यात गेल्याने गेले दोन दिवस शहरातील अनेक भागातील लाइटही गायब आहे.
सोमवारी पहाटे पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने अर्जुना नदीने गाठलेली धोका पातळी कमी झाली असली तरी अद्यापही अर्जुना नदी इशारापातळीच्या वर वाहत आहे. सोमवारी सकाळनंतर शहरातील जवाहर चौकासह बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी ओसरले असले तरी सोमवारचा संपूर्ण दिवस व्यापारी व नागरिकांना चिखल काढण्यात व साफसफाई करण्यात घालवाला लागला आहे. परिणामी आजही व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवावी लागल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
जवाहर चौकात असलेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर सोमवारी दुपारपासून एसटी वाहतूक जवाहर चौकात सुरू करण्यात आली आहे. तर पूर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले, तरी अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने व हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राजापूर शहरावरील पुराच्या पाण्याचे संकट कायम आहे.



