जिल्हा परिषद इमारतीत दवाखान्याचे उद्घाटन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध कामानिमित्त येणारे अभ्यागंत यांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद इमारतीत दवाखाना सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन काल (२२ जुलै) करण्यात आले.
मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. आरोग्य, ग्रामपंचायत, शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, समाजकल्याण असे विविध विभाग आहेत. त्याठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच जिल्हाभरातून अनेक लोकं विविध कामे घेऊन जिल्हा परिषदेत येतात. त्यांच्यापैकी कुणाला तातडीने प्राथमिक उपचाराची गरज भासली तर जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यंदा कडाक्याचा उन्हाळा जाणवला, तर पावसाळ्यातही साथींचे आजार पसरत आहेत. काहीवेळा आजारी रुग्ण कामाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत येतो आणि त्यांची तब्बेत बिघडते. अशावेळी तातडीने उपचार मिळावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी जिल्हा परिषद इमारतीमध्ये दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. या दवाखान्याचे उद्घाटन सोमवारी झाले. या वेळी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी नियुक्त
जिल्हा परिषद येथे सुरू केलेल्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवीदास चरके यांची नियुक्ती केली आहे. तसेच दवाखान्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 अशी राहणार आहे. याच कालावधीत बऱ्यापैकी लोकं येत असतात. या आरोग्यसेवेचा लाभ अभ्यागत आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सीईओ पुजार यांनी केले आहे.



