राजापुरात पुन्हा मुसळधार

राजापूर : रविवारी (२१ जुलै) सकाळपासून पुन्हा मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोदवली नदीचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरल्याने पुन्हा एकदा राजापूरकरांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला आहे . शहरातील जवाहर चौकासह वरचीपेठ मछिमार्केट कोंड्येतड आदी भागांना पुराच्या पाण्याचा विळखा पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एस्टी प्रशासनाने जवाहर चौकातली वाहतूक बंद केली असून, बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
जुलैच्या पहिल्या रविवारी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने शहर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते; मात्र दुसऱ्या रविवारी पाण्याची पातळी काहीशी कमी राहिल्याने व पुराचे पाणी संथगतीने शहरात भरल्याने व्यापारीवर्गाला आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास वेळ मिळाला होता; मात्र आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली. सकाळपासून संततधारेने बरसणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोदवली नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पुराच्या पाण्याने दुपारपर्यंत जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत मजल मारली होती.
सकाळपासून तुफान पाऊस पडत असल्याने व्यापारी नागरिकांनी सावधानी घेत आपले समान सुरक्षित स्थळी हलवले होते; मात्र जावाहर चौकातील वाहतूक बंद झाल्याने व बाजारपेठेवरही पुराचे सावट असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
रविवारी सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या असून कुठेही वित्त अथवा जीवीत हानी झालेली नाही; मात्र अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. शीळ-गोठणे रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला होता.



