शेर खामोश क्यूँ हैं?

लोकसभा निवडणुकीचा धमाका असा काही अजब होता की, देशातील स्वतःला परमेश्वराचा अवतार समजणाऱ्यांना आणि आपल्या ‘इडी’च्या पंज्याने भल्याभल्यांना घायाळ करणाऱ्या यच्चयावत गुजरातचे शेर अचानक खामोश झाले. लोकसभेत राहुल गांधी हा विरोधीपक्ष नेता आरोपांच्या एके ४७ झाडत असताना त्या सहन करण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत. हाच सन्नाटा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पसरला. तब्बल १० हजारांचे डेफीसीएट, म्हणजे चक्क एक लाखांची पिछेहाट. हे फारच धक्कादायक होते, आश्चर्यकारक होते!
लोकसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (शिंदेगट) आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा मनापासून प्रचार केला. प्रसंगी किरण सामंत यांना अमित शहा यांनी अखेरच्या क्षणी लोकसभेची उमेदवारी नाकारली असताना, बंधुराजांची नाराजी कुरवाळत न बसता रत्नागिरीचे आमदार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राणेंबाबत पपूर्वीची कटूता असतानाही महायुतीची नैतिकता प्रमाण मानत मनापासून नारायण राणे यांचा प्रचार केला. मतदारसंघात स्वतः फिरून सभा घेतल्या. कार्यकर्त्यांना क्रियाशील केले; मात्र तरीही रत्नागिरी जिल्ह्याने नारायण राणे यांना नाकारले. त्याची अनेक कारणे आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या राजकारणात ती दडली आहेत. जे रत्नागिरीत झाले, तेच चिपळूण मतदारसंघात झाले. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे लोकसभेतील मताधिक्य वजा २० हजार झाले; मात्र या साऱ्यांची जबाबदारी नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांनी थेट उदय सांमत यांच्या माथी मारत जे आकाडतांडव केले ते उद्याच्या राजकीय वातावरणाची दिशासूचक होते. रत्नागिरी विधानसभा हा भाजपचाच मतदारसंघ आहे आणि तो भाजपकडूनच लढविला जाणार, अशी घोषणाच करत त्यांनी थेट उदय सांमत यांनाच आव्हान दिले आहे आणि आपण नक्की कोणत्या स्तरावर राजकारण करू शकतो याची झलक हिंदु आक्रोश मोर्चातून दर्शविली. हा मोर्चा रत्नागिरीच्या भाईचारा वातारणाला नख लावणारा होता; परंतु राजकारणात कोण मरतो आणि उध्वस्त होतो, त्यापेक्षा कोण त्यातून जिंकतो याला महत्त्व देणारी विचारधारा हेच नवे आव्हान या निवडणुकीत आहे.
उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघाचे गेली २० वर्ष प्रतिनिधीत्व करत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक नस अन नस त्यांना परिचित आहे. गेल्या २० वर्षांत या मतदारसंघातील एकही गाव, वॉर्ड असा नसेल की जेथे त्यांच्या माध्यमातून काम झाले नाही. रस्ते, गटार, पाणी योजना, पुल, स्मशानभूमी, बंधारा, वर्ग खोल्या, दवाखाना, ग्रामपंचायत इमारत अशा माध्यमांतून होणारी ही कामे बहुतांश वाड्या आणि गावांना जोडली जाणारी आहेत. असे असतानाही राणे यांच्या आव्हानाचा आणि लोकसभेतील मतांच्या फरकाचा धसका त्यांनी घेतला असावा. त्यामुळेच येत्या विधानसभेच्या बॅटलवर ते अत्यंत ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मतदारसंघात तुफानी संपर्क सुरू केला आहे. सोबत विविध योजना आणि त्यांच्या घोषणांचा सुकाळ ह्यावर्षीच्या तुफानी पावसालाही मागे टाकणारा आहे. लाडकी बहीण बिदागी हा दारुण पराभवावरील जालीम उपाय महाराष्ट्रासोबतच (४६ हजार कोटी, ह्याची तरतूद कोणत्या बजेट हे प्रश्न अनुत्तरीत) रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. त्या सोबतच जिंदाल प्रकल्पग्रस्त बोटधारकांना भत्ता वाटप, नांदीवडेत २ कोटी मंजुरीचे पत्र, अवैद्य वृक्षतोड करणाऱ्यांना दंड शिथिल योजना, संविधान बदलणार नाही, मुस्लिम समाजाला संकटाला सामोरे जावे लागणार नाही असे अभिवचन, जिल्ह्यात सीआरपीना २ हजार ६४३ मोबाईलचे वाटप, स्टरलाईट कंपनीची वर्षानुवर्षे पडीक राहिलेली रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती असणारी ५०० एकर जागा कोर्टाकडून एमआयडीसीला मिळविण्यात मोठे यश, त्यातील २०० एकर जागा संरक्षण दलाला देणार, त्यातील ५ एकर जागा रत्नागिरी नगर पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला देणार, त्यातून रत्नागिरी शहराचा गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारा आणि सर्वाधिक संवेदनशील असणारा घनकचरा प्रकल्पाची उभारणी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याला जोडूनच एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता या निमित्ताने चर्चित आहे. उद्योग मंत्री म्हणून सतत दोन वर्षे ना. उदय सामंत स्वित्झर्लंड येथील दाओस या जगाच्या औद्योगिक कॅान्फरन्सला जातात. तेथून पहिल्या वेळेला १ लाख कोटीचा करार झाल्याचे सांगतात. त्यानंतरही अशाच काही लाख कोटींच्या घोषणा झाल्या; मात्र आजपर्यंत एकही प्रकल्प आला नाही की गुंतवणूक अशी टीका विरोधक करत आहेत. ह्या टीकेला चपखल उत्तर देण्याच्या तयारीत ना. सामंत असून नुकताच त्यांनी जर्मनी येथील मर्सिडीज बेंझ कार प्रकल्पाला भेट देत ३ हजार कोटींचा विस्तारीत प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे सूचक विधान केले होते. बहुदा हा कार प्रकल्प रत्नागिरी येथील स्टरलाईट जागेवर सुरू करत ते या मतदारसंघातील जोरदार अखेरचा विजयी षटकार ठोकणार अशी चर्चा आहे.
एमआयडीसी खात्यातील अधिकाधिक निधी खर्च करताना त्यांनी महाराष्ट्रातील एसटी डेपोंना प्राधान्य दिले आहे. ६०० कोटींचा निधी ते एसटी डेपो सुधारण्यासाठी वळता करत आहेत. यांत त्यांचा रत्नागिरी शहरातील सर्वाधिक दुखरी जागा म्हणून ओळखला जाणारा एसटी डेपो प्रकल्प मार्गी लागणार आहे. त्यामुळे बहुतांश प्रश्न निपटत ते कामांनेच आपला अहवाल सादर करत पाचव्या निवडणुकीची तयारी करत आहेत.
अशा वातावरणात त्यांना मुख्य आव्हान उभे रहात आहे ते शिवसेना ठाकरे गटाकडून आणि दुसरे त्यांच्याच युतीच्या राणे गटाकडून; मात्र ही आव्हाने किरकोळ स्वरूपात आहेत. “मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की रान तुम्हाला मोकळे आहे” असा इशाराच त्यांनी नुकताच दिला आहे.
“शेर खामोश हैं
उसका मतलब ये नही
जंगल तुम्हारा हैं!”
असा इशाराच आपल्या स्पर्धकांना आणि विरोधकांना देत सामंत यांनी निधी आणि विकास कामांच्या घोषणांचा धडाका उडविला आहे; मात्र असे असतानाही विधानसभेतील अनेक चर्चातून ते बॅकफुटला गेल्याचे दिसत आहे. त्यांच्यासाठी सामना पूर्वीसारखा सहज सोपा नाही… त्यामुळेच विरोधक मध्येच त्यांना चिमटे काढत आहेत, “आप खामोश क्यू हो भाई….?


