मुख्य बातमी

निवळी तिठा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखु जप्त

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निवळी तिठा येथे ११ जुलैला रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास कारवाई करत ८ लाखांचा शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी तिघांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी : ११ जुलैला काही इसम हातखंबा -निवळी-गणपतीपुळे रोडने शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थाची बोलेरो चारचाकी वाहनातून वाहतूक करणार आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी पथक तयार करून त्यांना कारवाईसाठी रवाना केले. त्याप्रमाणे हे पथक ११ जुलै रोजी १०.१५ वाजता हातखंबा निवळी, गणपतीपुळे अशी पेट्रोलिंग करीत असताना मौजे निवळी तिठा येथे निवळी ते गणपतीपुळे जाणारे रोडच्या उजव्या बाजूला कच्च्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी उभी असलेली दिसली. या गाडीची पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी रत्नागिरी व पंच यांच्या समक्ष तपासणी केली असता गाडीच्या मागील हौद्यामध्ये ८ लाख ४ हजार ११६ रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ सापडला.

त्याप्रमाणे शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखु व चारचाकी वाहन मिळून एकूण १५ लाख २९ हजार ११६ रुपये किंमतीचा मुद्देमाल संकेत शिवाजी चव्हाण (२०, रा. फणसोप सडा, फणसोप हायस्कुलजवळ, घर नं.७२९, ता. जि. रत्नागिरी), विशाल बळवंत घोरपडे (३२, रा. खटाव, ता. मिरज, जि. सांगली, सद्या रा. फणसोप सडा शिवाजी आनंदराव चव्हाण यांचे घरी, ता.जि. रत्नागिरी), सुरज राजू साळुंखे (३३, रा. पुणे धायरी, तानाजीनगर, घर नं. ३९, ता. जि. पुणे, सद्या रा. फणसोप सडा, शिवाजी आनंदराव चव्हाण यांचे घरी, ता. जि.रत्नागिरी) यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी या तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३,२७४,२७५,२२३.३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i).२६ (२) (iv),२७ (३) (d),३० (२) (a).३(१) (zz) (iv), ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष भागणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळु पालकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण खांबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश शेट्ये आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button