पावसाळ्यात शीळ धरणाचे पाणी साठवून पानवल धरणाचे पाणी वापरावे
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष नीलेश भोसले यांची निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी : शहरासाठी सुधारीत नळपाणी योजना २०१६ मध्ये हाती घेण्यात आली होती. या योजनेतून नागरिकांना दररोज २४ तास पाणी पुरवठा केला जाईल, असे नियोजन होते; परंतु आठ वर्षानंतरही नागरिकांना यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी करावी. तसेच पानवल धरणाचे १३०० मीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करून योजनेच्या नियोजनाप्रमाणे पावसाळ्यात शीळ धरणाचे पाणी साठवावे आणि पानवल धरणाचे पाणी वापरावे, अशा मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी शहरामध्ये सुधारीत नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. ही योजना २०१६मध्ये मंजूर झाली; मात्र तो टेंडर होऊन वर्कऑर्डर देण्यासाठी २०१७ उजाडले. सन २०१६ ते २०२४ अशी सुमारे ८ वर्षे झाली तरी अजूनही नळपाणी योजना अपूर्ण आहे. ही दुर्दैवी बाब आहे. ही योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्ष असताना कॉन्ट्रक्टरचे लाड पुरवण्याचे काम नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी केले हे सर्व नागरिकांना माहितच आहे. म्हणून लोकांना आज एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन करावे लागले. गेली काही वर्षे लोकांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेने ज्या ठेकेदाराची नियुक्ती केली. तो नॉनक्वालीफाय कॉन्ट्रक्टर असून, त्याने अशा प्रकारचे काम यापूर्वी कधीच केले नाही. त्याबाबत खोटे दस्तऐवज तयार करून क्वालीफाय होण्यासाठी खोटी प्रमाणपत्र दाखल केली. त्याबाबत संबंधित ठेकेदाराच्या विरुध्द नगरपालिकेने ठेका देण्यापूर्वी संबंधितांना नगरपालिकेच्या लक्षात आणून दिले होते; मात्र सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने तोच कॉन्ट्रक्टर नेमायचे हे ठरविले होते म्हणून आज नगरपालिकेची सुधारित नळपाणी योजना निकृष्ट दर्जाची झाली आहे.
या कामापैकी पानवल धरण ते नाचणे फिल्टर प्लांट, शीळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन ही कामे झाली नाहीत, पानवल ते नाचणे फिल्टर हाऊसपर्यंतची १३०० मोटरची पाईपलाईन अद्याप जुळली न गेल्यामुळे पुढील वर्षीही लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ पालिका प्रशासन आणि राज्याचे सत्ताधारी पुन्हा आणणार आहेत. गेल्या आठ वर्षांत १३०० मीटर लाईनची तरतूद आपण प्रशासक म्हणून केली नाही. या योजनेचे २४ x ७ (२४ तास दररोज) जनतेला पाणी देण्याचे नियोजन केलेले असताना लोकांना अद्याप २४ तास पाणी देण्यात आले नाही ही दुर्दैवी बाब आहे. गेल्यावर्षीही माझी मागणी होटि, तसे निवेदनही आपणास दिले आहे आणि आपण व श्री. बोईर यांच्याबरोबर झोनप्रमाणे पावसाळ्यामध्ये २४ तास पाणी जनतेला देण्याचे सूचित केले होते. आपण त्याला मान्यताही दर्शविली होती; मात्र आपण पालकमंत्री व त्यांचे भाऊ किरण सांमत यांच्या सांगण्यावरून जनतेला २४ तास पाणी देण्यापासून वंचित ठेवले का? असा प्रश्न मला व जनतेला पडला आहे.
तरी या वर्षी पावसाळयामध्ये २४ तास जनतेला पाणी द्यावे. पानवल धरणाचे १३०० मीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करून योजनेच्या नियोजनाप्रमाणे पावसाळयामध्ये शीळ धरणाचे पाणी साठवावे आणि पानवल धरणाचे पाणी पावसाळ्यामध्ये वापरावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



