
रत्नागिरी : संपूर्ण रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरी मंदिरात शहरातील कर्ला भंडारवाडी येथील समित उर्फ सॅम अशोक पिलणकर या दर्शनासाठी आलेल्या युवकाने हैदोस घालत दोघांना जखमी केले. ही घटना आज (२ जुलै) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्याने घडली. या युवकावर शहर पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे.
आज दुपारी १२ वाजता सिव्हिल इंजिनिअर असलेला समित नेहमीप्रमाणे भैरी मंदिरात आला. देवाला पाया पडल्यानंतर तो चक्क गाभाऱ्यात देवाच्या बाजूला जाऊन बसला. क्षणभर कोणालाच काही समजले नाही; मात्र झाला प्रकार लक्षात आल्यानंतर मंदिरात हजर असलेले पुजारी चंदू गुरव यांनी त्याला हटकले. यावर त्याने श्री. गुरव यांच्या डोक्यात अंगाऱ्याचे भांडे मारले. त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा समीर गुरव पुढे आला असताना त्याच्याही डोक्यात घंटा घालून त्यालाही जखमी केले. तसेच देवळाचे कर्मचारी श्री. गावडे यांनाही मारहाण केली.
ह्या प्रकाराने मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, जखमी पुजारी चंदू गुरव व त्याचा मुलगा समीर गुरव यांना शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत; तसेच समित याला ही पोलिसांनी उपचारासाठी डॉक्टराकडे नेले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे.



