कोकण पदवीधर इतिहास बदलणार!

– अभिजित हेगशेट्ये
देशातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा प्रभाव नुकत्याच होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघात प्रकर्षाने जाणवू लागला आहे. देशातील लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार ‘मोदी की गॅरेंटी’, ‘इस बार चारसो पार’ अशा भन्नाट गगनभेदी नाऱ्याने देशात विरोधकांना सुईच्या आगरावर तरी जागा मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत होता आणि प्रत्यक्षात मो’दी की गॅरेंटी’ला लोकसभेत बहुमत मिळविणेही शक्य झाले नाही, तर सोबतच्या पक्षांच्या आधारावर केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. या नैतिक पराभवाचा परिणाम महाविकास आघाडीचे मनोबल शतपटीने वाढण्यात झाला आहे. याचा पहिला परिणाम येत्या २६ जूनला होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत ठळकपणे समोर येणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ यावेळी इतिहासाचे नवे पान लिहिणार असे संकेत समाजमन देत आहे. हा मतदासंघ पारंपरिक भाजपचा मानला जातो. या मतदारसंघातून २०१२ मध्ये राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी भाजपचा पराभव करत विजय मिळविला; मात्र पुढच्या सहा वर्षांत त्यांना निवडणूक अशक्य वाटू लागली आणि त्यांनी भाजपचा आश्रय घेत पुन्हा निवडणूक जिंकली. या निवडणुकीत ते भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्यासमोर कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश कीर उभे आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), शेकाप यांनी आपला पूर्ण पाठिंबा कॉँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना दिल्याने यांची बाजू फार भक्कम झाली आहे. यावेळी लढत खऱ्या अर्थाने दुरंगी असल्याने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना ती सोपी नाही, तर रमेश कीर हे येथील पारंपरिक इतिहास बदलणारे उमेदवार ठरू शकतात अशी परिस्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेचे राज ठाकरे यांनी आपल्या “लाव रे तो व्हिडीओ” या पहिल्या मोदी सरकारच्या विरोधातील भूमिकेला अचानक तिलांजली देत थेट मोदी यांच्या समर्थनाची जाहीर भूमिका घेत मोदी सरकारच्या प्रचार यंत्रणात स्वतःचा एकही उमेदवार नसताना उतरले. राज ठाकरे यांच्या कोकणातील प्रचाराचा आणि मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाचा मान राखत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना संपूर्ण शक्तिनिशी मदत केली. त्यामुळेच नारायण राणे यांचा विजय झाला. अशी पार्श्वभूमी असताना आता भाजप हा आपल्या शब्दाबाहेर नाही अशा आवेशात राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरे शैलीत कोकण पदवीधरमधून अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्जही थेट दाखल केला. येथील भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे असताना हे कसे काय? असा प्रश्न विरोधकांनाही पडला. नंतर पेल्यातील वादळ जोरात उसळले आणि तेथेच शांत झाले. पानसरे यांना अर्ज मागे घेण्याची पाळी राज ठाकरे यांच्यावर भाजपने आणली. याचा रोष प्रत्यक्षात मतदारसंघात डावखरे यांना किती सहन करावा लागतो हे निवडणूक निकालच दर्शवणार आहे.
यावेळची निवडणूक वैशिष्ठ्यपूर्ण आहे ती येथील वाढलेल्या प्रचंड मतदार संख्येमुळे. या मतदासंघात यावेळी २ लाख २३ हजार २२२ मतदारांची नोंद आहे. मागील निवडणुकीपेक्षा ही संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. तब्बल एक लाख वीस हजार मते वाढली आहेत. ही वाढीव मते निश्चित कोणी केली आहेत, ती कोणाच्या पारड्यात जाणार आहेत यावर येथील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
निरंजन डावखरे यांची ही तिसरी निवडणूक. त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ आणि येथील मतदार यांची उत्तम ओळख आहे. त्यांना या मतदारसंघात प्रचार करणे आणि मतदारांना आपलेसे करणे अधिक सोपे आहे. या मतदारसंघात फिरताना त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या राजकीय ओळखीचा फायदा झाला आहे आणि होत रहातो; मात्र दोन वेळा येथून निवडून गेल्यावर त्यांनी मागील पाच वर्षांत या मतदारसंघातील पदवीधरांसाठी, त्यातील सर्वाधिक मोठ्या संख्येने असणाऱ्या शिक्षकांसाठी कोणत्या स्वरूपाची कामे केली? याचा अहवाल त्यांना देणे क्रमप्राप्त आहे. मागील पाच वर्षांत तर त्यांचा या मतदारसंघात संपर्क कोठे होता, असे मतदार त्यांना विचारत आहेत. आपण मागील पाच वर्षांत कोणती कामे केली आहेत? आपणाला यावेळी का मतदान करावे? हा प्रश्नही त्यांना विचारला जात आहे. सतत सत्तेत असल्यावर कामाचा जबाब द्यावा लागतो हा ॲन्टी इन्कमबन्सी सत्ताधारी यंत्रणे विरोधातील नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो. विशेषतः महाराष्ट्रात भाजपला जो सत्तेच्या नाराजीचा फटका बसला त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रमेश कीर हे कॉँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. कोकण म्हाडा बोर्डावर त्यांनी काम केले आहे. विविध शिक्षण संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. एक मोठे उद्योजक आहेत. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सोबतचे कोकणातील प्रमुख नेते म्हणून त्यांचा परिचय आहे. राजकारातील स्वच्छ चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. या मतदारसंघातील मतदार नोंदणी यावर त्यांनी मागील दोन वर्षे काम केले आहे. ८० ते ९० हजार मतदारांची नोंदणी आपण केल्याचे ते सांगतात. आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत मतांच्या खरेदीचा जो बाजार होत आहे त्याला त्यांचा तीव्र विरोध आहे. आपण आणि आपले मत विकू नका हा त्यांचा मुळ संदेश घेऊन ते कोकणातील पाचही जिल्ह्यांत फिरत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी, शेकाप आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचा मोठा सक्रिय पाठिंबा आहे. सोबत राहुल गांधी यांच्या काँग्रेसची जबरदस्त लाट यामुळे आपला विजय नक्की असल्याचा विश्वास कीर व्यक्त करत आहेत.
या निवडणुकीवर ठाणे, रायगड जिल्ह्याचे वर्चस्व असते. त्यामुळे याच जिल्ह्यातील उमेदवार या निवडणुकीच्या स्पर्धेत असतात; मात्र यावेळी प्रथमच रमेश कीर यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याला आणि दक्षिण कोकणला संधी मिळत आहे. ठाणे, रायगड येथील मतदार संख्या मोठी आहे; परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे यावेळी ४४ हजार मतांची मॅजिक फिगर आहे आणि तोच मोठा चमत्कार घडविणार, असा आडाखा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.


