२३ जून ला मालवण येथे समाज संवाद साहित्य संमेलनाचे आयोजन

रत्नागिरी : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवारी (२३ जून) समाज संवाद साहित्य संमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण सभागृहात होणार आहे. समीक्षक प्रा. रणधीर शिंदे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असून, समीक्षक प्रा. दत्ता घोलप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष तथा संत साहित्याचे अभ्यासक ऍड. देवदत्त परुळेकर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक, कवी अजय कांडर हेही उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून, पहिल्या सत्रात ग्रंथ प्रकाशन होईल. त्यानंतर संपादक प्रा. संजीवनी पाटील आणि मधुकर मातोंडकर यांचा सहभाग असलेला ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ आणि त्यानंतर संपादक अजय कांडर आणि जिजा शिंदे यांचा सहभाग असलेला ‘सारेच पुरुष बदनाम नसतात : चर्चा आणि चिकित्सा’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार या पुरस्काराचे वितरण होईल.
दुसऱ्या सत्रात दुपारी १२.३० वाजत साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘ साने गुरुजी समजून घेताना’ या विषयावर ऍड. देवदत्त परुळेकर यांचे विशेष व्याख्यान होईल. तिसऱ्या सत्रात दुपारी २.३० वाजता खुले कविसंमेलन होणार असून, याचे अध्यक्षस्थान कवियित्री अंजली ढमाळ भूषविणार आहेत. यावेळी कवियित्री डॉ. दर्शना कोलते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या संमेलनात रसिकांनी सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी प्रियदर्शनी पारकर (९४०४९०६५७०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी केले आहे.



