मुख्य बातमी

सुनील बेंडखळे यांना सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार प्रदान

मुंबईत मान्यवरांच्या उपस्थित सोहळा

रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध लोकनाट्य ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्यातील प्रमुख कलावंत सुनील बेंडखळे ऊर्फ तात्या गावकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट लोककलावंत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुनील बेंडखळे यांनी आणि त्यांच्या टीमने ‘कोकणचा साज..’ या लोकनाट्याद्वारे कोकणातील पारंपरिक लोककला, कोकणातील संस्कृती नव्या पिढीपर्यंत मांडण्याचा, तसेच कोकणातील समस्यांवर प्रकाश टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सुमारे साडेचारशेहून अधिक प्रयोग या लोकनाट्याने गाठले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने याची दखल घेऊन यंदाचा सर्वोत्कृष्ट लोककलावंत हा पुरस्कार त्यांना जाहीर केला. त्याचे वितरण नुकतेच मुंबईत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात नाटककार कै. गो. ब. देवल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पार पडलेल्या आयोजित सोहळ्यादरम्यान झाले. यावेळी अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी विविध नाट्यसंस्था, तांत्रिक कलाकारांचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, विश्वस्त शशी प्रभू, अशोक हांडे, सहकार्यवाह सुनील ढगे, दिलीप कोरके, अभिनेत्री स्वाती चिटणीस, पूजा पवार, वर्षा उसगावकर, निर्मिती सावंत, अभिनेते जयवंत वाडकर, मोहन जोशी, राज्याचे उद्योगमंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अभिनेते संकर्षक कऱ्हाडे आणि समीरा गुजर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

तन्वी मोरेला गायनाची संधी
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित पार पडलेल्या या सोहळ्या दरम्यान नाट्यगीताचे गायन सादर करण्याचा मान रत्नागिरीच्या तन्वी मंगेश मोरे हिला मिळाला. सध्या सुरू असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त आयोजित जागर नाट्यकलेचा या उपक्रमांतर्गत आयोजित नाट्यगीत गायन स्पर्धेत तन्वीला पारितोषिक प्राप्त झाले आहे. ‘जागर नाट्यकलेचा’ मधील विविध एकपात्री, बालनाट्य, एकांकिका स्पर्धांमधील विजेत्यांचेही सादरीकरण या सोहळ्यात झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button