अशा लाल मातीत

पीएम स्कील स्कॅम संशयाची सुई थेट पटेलांकडे

-अभिजित हेगशेट्ये

बनावट आधारकार्डाद्वारे बोगस विद्यार्थी परीक्षेला बसविल्याच्या प्रकरणात रत्नागिरीतील आठ जणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. ही घटनाच सर्वसामान्यांना आणि रत्नागिरीकरांना हादरवणारी आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध भागांत अशा घटना घडत असतात. मध्यंतरी ‘नीट’ प्रकरणात मार्कांचे खुलेआम वाटप झाले आणि पैकीच्या पैकी मार्क मिळविण्याचा उच्चांक झाला. तरीही ‘नीट’ व्यवस्थापन त्याबदद्ल काहीच बोलत नव्हते. अखेर विद्यार्थी आंदोलन, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आणि कोर्टातील रीट यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले. रत्नागिरीसारख्या शहरात असा इतका बेमालूम खोटेपणा करणारा विचार येथील कोणतेच व्यवस्थापन करू शकत नाही, अशी येथील प्रामाणिक मानसिकता आहे. त्यामुळेच यामागे नक्की कोणते षडयंत्र कार्यरत आहे, याचा शोध घेणे हे पोलीस यंत्रणेचे मुख्य आव्हान ठरणार आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे एक शाश्वत स्वप्न आहे, ते रत्नागिरीला शैक्षणिक हब बनविण्याचे. रत्नागिरी शहर आणि परिसरात शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक विभाग नवतंत्रज्ञानाने सुसज्ज आणि अद्ययावत सुविधांसह उपलब्ध असेल. येथे रत्नागिरी, कोकणातील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणातील विविध संधी उपलब्ध होतीलच; मात्र देश-परदेशातील विद्यार्थी रत्नागिरीत उच्च शिक्षणासाठी येईल. रत्नागिरी हे एक भव्य व्यापक शिक्षण संकुल होईल, या माध्यमातून येथे हजारो विद्यार्थी येतील. त्यातून रोजगार, उद्योग यांच्या मोठ्या संधी या भागाला उपलब्ध होत जातील. अगदी खानावळ, रिक्षाचालक ते सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचतील. ज्या माध्यमातून आज कोकणातील सातत्याने रोजगारासाठी (मायग्रेट) स्थलांतरीत होणारा तरुण-तरुणी येथे थांबतील. सोबतीला पर्यटन, मत्स्य, फलोत्पादन हे निसर्ग आणि पर्यावरणपूरक उद्योगही विकसित होतील. खऱ्या अर्थाने कोकणचा कॅलिफोर्निया होऊ शकेल.
एकदा गप्पांच्या मैफलीत सामंत म्हणाले होते, ‘रस्ते, पुल, पाणी, कारखाने आणि काही विशेष सुविधा या गोष्टी होत राहतातच. ते तर शासनाच्या पातळीवर होत आहेत आणि होत राहील, परंतु माझे स्वप्न आहे या शहराला आणि या परिसराला शिक्षण हब बनविण्याचे. माझी खरी ओळख मला शिक्षण माध्यमातून नोंदलेली अधिक आवडेल. जी कोकणच्या विकासाचा मानबिंदू ठरेल.’ यावेळी त्यांनी नांदेड येथील एका भेटीची आठवण सांगितली होती. ‘माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील फार मोठे व्यक्तिमत्व शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी फार मोठे योगदान दिले. जायकवाडी, पूर्णा, मांजरा यांसारख्या प्रकल्पातून मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग शोधला; मात्र आज त्यांना मराठवाड्यातील तरुण विद्यार्थी सतत आठवण काढतो आणि धन्यवाद देत रहातो ते त्यांनी मराठवाड्यात सुरू केलेल्या मेडिकल कॅालेज ते अन्य उच्च शैक्षणिक कार्याने. माझ्या समोर तो आदर्श आहे.’
मागील ३ वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत रत्नागिरीकरांना हा फरक विशेषत्वाने जाणवला आहे. रत्नागिरीसाठी अशक्य मानले जाणारे, ज्याची प्रतीक्षा गेले अर्धशतक रत्नागिरीकर करत होते ते शासकीय मेडिकल कॅालेज ना. सामंत यांनी रत्नागिरीत आणले. पहिल्याच वर्षी त्याची १०० अॅडमिशन होत ते सुरूही झाले. त्या सोबतच शासकीय अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) महाविद्यालय, औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ उपकेंद्र, संस्कृत विद्यापीठ आदी ही यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रातील ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत शिक्षण मिळण्यासाठी इन्फोसिससोबतचा सामंजस्य करार. यांतीलच एक भाग म्हणजे रत्नागिरी येथे स्वतंत्र कौशल्याधारीत (स्किल बेस) शिक्षण देणारे विशेष अद्यावत सेंटर उभारण्याची संकल्पना. रत्नागिरी येथे कौशल्य विकास केंद्र हा ना. सामंत यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक भाग. येथील विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत शिक्षण देऊन त्यांच्या हाताना रोजगाराची संधी देणे हा त्यातील मुख्य उद्देश होता. यासाठी जवळपास ४० कोटी निधी शासनाकडून उपलब्ध करण्यासाठी सामंत यांनी खास प्रयत्न केले आणि महाराष्ट्रातील अत्यंत अद्ययावत सुसज्ज असे स्कीलबेस प्रशिक्षण सेंटर उभारले. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. खऱ्या अर्थाने रत्नागिरीतील तरुणाला स्किलबेस शिक्षणाची सुविधा आणि थेट रोजगाराची सुविधा निर्माण करणारा आशावाद निर्माण झाला. याचा प्रसार आणि प्रचार थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचला. थेट ग्रामपंचायत यंत्रणा त्या-त्या भागातील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी माहिती देऊ लागली आणि विद्यार्थ्यांचा ओढा इकडे सुरूही झाला.
‘स्किल ट्री’ नावाची कोणी राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणा हे सेंटर चालवत आहे, असे सुरूवातीला जाहीर झाले होते. त्यांची पहिली जाहिरात होती….
”कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी येथे Meet & Greet हे नवीन प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यामध्ये (Front office associate, food and beverage service, house keeping) फ्रंट यांचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण फक्त दोन महिन्यांचे असेल. वयोमर्यादा वय १८ ते २७ पुरती मर्यादित. यामध्ये १०० टक्के नोकरीची हमी व हे प्रत्येक व्यक्तीला अनिवार्य असेल. महत्त्वाची सूचना : हे प्रशिक्षण अगदी मोफत आहे.” अशी जाहिरात असताना हे प्रशिक्षण केंद्रात सुरूवातीला प्रत्येक विद्यार्थ्याकडून २० ते ३० हजार फी घेण्यात आली. त्यानंतर ती ३ हजार ते ५ हजार जशी विद्यार्थ्यांना शक्य असेल अशी घेण्यात आली. जर हे कौशल्य विकास केंद्र राज्य शासनाच्या पैशांतून उभे राहिले होते आणि त्याला पंतप्रधान कौशल्य योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होता; तसेच ते पूर्ण मोफत आहे असे सांगितले होते. मग कोकणातील मुलांसाठी सुरू केलेल्या या शासनपुरस्कृत कौशल्य केंद्रातून विद्यार्थ्यांची फी का आकरली जात होती? ती कोण घेत होते? नक्की ती कोणाच्या खात्यावर जात होती? याचा मुख्य तपास होणे गरजेचे आहे.
रत्नागिरीत एकमेव सुरू झालेल्या या कौशल्य केंद्राबाबत आज मोठा स्कॅम झाल्यानिमित्ताने फार मोठा गदारोळ होत आहे. यात एकप्रकारे हे केंद्र ज्यांनी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून येथे आणले त्यासाठी कोट्यावधींचा निधी आणला, कोकणातील विद्यार्थ्यांसाठी प्रसंगी इतरांचा वाईटपणा स्विकारत मोठ्या धाडसाने येथे निधी वळवत हे केंद्र सुरू केले. मुख्यमंत्र्यांना त्यासाठी येथे पाचारण करत त्याला फार मोठे राज्यस्तरीय व्यापक स्वरूप दिले ते पालकमंत्री ना. उदय सामंत यांनाच एकप्रकारे दोष देण्याचे कारस्थान या निमित्ताने येणाऱ्या बातम्यात दिसत आहे. ते पूर्णत: अयोग्य आणि या जिल्ह्याचे आणि येथील विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे आहे. त्यापेक्षा याच्या मागील मुख्य चालक आणि चाणक्य कोण आहे, येथपर्यंत जाणे गरजेचे आहे.
आज येथील कर्मचारी जे काही रोजगाराच्या निमित्ताने येथे सांगितल्या प्रमाणे काम करत होते, अशांना ४२०, ४६५, ४६८, ४७१,२०१,३४ या भा. दं. वि. कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानिमित्ताने प्रश्न आहे, या कर्मचाऱ्यांना असे करण्यास कोणी भाग पाडले असेल, त्या मागचा सूत्रधार कोण आहे? कोणाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि त्यांचे राजकीय सामाजिक अस्तित्व उद्ध्वस्त करण्यासाठीचे हे थेट वरिष्ठ पातळीवरील कारस्थान तर नसेल ना? यांचा विचार होणे गरजेचे आहे.
रत्नागिरी कौशल्य प्रशिक्षण केंद्र हे ”ट्री स्किल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी”तर्फे चालविले जात आहे. गुरगाव हरयांणा येथील ही रजिस्टर कंपनी असून, तिचे मुख्य संचालक (एमडी) आहेत प्रतीक रमणभाई पटेल. थेट दिल्लीशी नाते असणारे आणि देशात विविध स्किल सेंटर चालविणारे प्रतीक रमणभाई पटेल यांच्यापर्यंत तपास पोहोचला तर यांतील खरी गोम पुढे येईल. आज स्थानिक पातळीवर गैरव्यवहार केल्याची बोंब करत येथील कर्मचाऱ्याला तुरुंगात जावे लागणार; मात्र त्यांचा वापर कोण? कसा? आणि कोणाविरोधात करत आहे? याचा तपास लागणे महत्त्वाचे. कदाचित काळाच्या ओघात सारेच विसरून जातील. रत्नागिरीकरांना असे स्कॅम पचविण्याची सवयच आहे; मात्र पालकमंत्री सामंत यांनी मोठ्या उमेदीने सुरू केलेला हा कौशल्याधारीत विभाग बंद होणार नाही याची रत्नागिरीकरांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button