मुख्य बातमीशैक्षणिक

इलेक्ट्रिक कारच्या सनरूफमधून फुगे उडवत कशेळीत नवागतांचे स्वागत

रत्नागिरी : तालुक्यातील कशेळी गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कशेळी क्रमांक १ या शाळेत मुख्याध्यापक प्रवीण किणे यांच्या अनोख्या संकल्पनेतून शाळेच्या पहिल्या दिवशी लेझीम, ढोल-ताशांच्या गजराबरोबरच पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांची इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसून मिरवणूक काढण्यात आली. गाडीच्या सन रूफमधून फुगे उडवत मुलांनी जल्लोषात शाळेत पहिले पाऊल ठेवले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सगळीकडे शाळेच्या पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे नवागतांचे स्वागत करण्यात आले. कशेळी शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्षारोपण करून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत एक झाड वाढवण्याचा संकल्प केला. ही मुले जशी वाढतील तशी ही झाडे सुद्धा वाढते व पर्यावरणाला जपणारी एक नवीन पिढी तयार होईल, असा विश्वास यावेळी पालकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी शिक्षक शिवराम किनरे, प्रदीप करंबेळकर, लवेश गोरे यांचे सहकार्य लाभले. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कासार, शिक्षणाधिकारी योजना श्री. लोहार, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील, विस्तार अधिकारी दत्तात्रय सोपनूर व केंद्रप्रमुख श्री. सर यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण किणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या शाळेमधील पहिलीपासूनचे सर्व विद्यार्थी सर्व सूचनांसहित पूर्ण परिपाठ इंग्रजीमध्ये करतात. शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी नवनवीन संकल्पना शिक्षकांच्या मनामध्ये रुजत आहेत. अशा पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक विविध कल्पना मधून नवीन मुलांचे स्वागत करण्यात आले. प्रदूषणाचे धोके, ग्रीन एनर्जीची गरज, व वृक्ष लागवड यांचा सुरेख मेळ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कशेळी क्रमांक १ यांनी घातला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमासाठी पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button