
रत्नागिरी : रत्नागिरीतील रसिक कलाकारांसाठी आर्च एंटरप्रायजेस आणि समर्थ इन्व्हेस्टमेंटने नवी पर्वणी आणली असून २०२३-२४ या वर्षातील १२ कार्यक्रमांच्या मालिकेतील तिसरे व अखेरचे पर्व रत्नागिरीत होत असून त्यानिमित्ताने ‘शिवकल्याण राजा’ प्रथमच नृत्यस्वरुपात रत्नागिरीकरांना पहायला मिळणार आहे. आर्च एंटरप्रायझेसने संकल्पित केलेल्या २०२३-२४ या वर्षामधील १२ कार्यक्रमांच्या मालिकेतील तिसरे व अखेरचे पर्व ह्या वर्षी १६ जून ते २० जून या दरम्यान होणार आहे. या पर्वामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम येत्या रविवारी (१६ जून) सायंकाळी ६ वाजता, रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये होणार आहे, अशी माहिती आर्च एंटरप्रायझेसचे विनीत गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतरत्न लता मंगेशकर, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भावगंधर्व पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावंतांनी निर्मिलेल्या ‘शिवकल्याण राजा’ या महानिर्मितीमधील ‘प्राणीमात्र झाले दुःखी’ पासून ‘निश्चयाचा महामेरू’ पर्यंतच्या सर्व दहाच्या दहा गीतांवर वैशाली पोतदार या व त्यांच्या शिष्यांगना नृत्यप्रस्तुती या कार्यक्रमात सादर करणार आहेत. तर सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक श्रीराम केळकर शिवचरित्र कथन करतील.
‘शिवकल्याण राजा’ (प्रथमच नृत्य स्वरूपात) या शीर्षकांतर्गत सादर होणार्या या सोहळ्यामध्ये देखणे नेपथ्य, नेत्रदीपक नृत्यसंरचना, तितकीच कल्पक अशी प्रकाशसंरचना आणि ओजस्वी वाणीमधून सामोरे आलेलं शिवचरित्र तमाम रत्नागिरीकरांनी घ्यावा असे आवाहन आर्च एंटरप्रायजेस आणि समर्थ इन्व्हेस्टमेंट यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला विनीत गोरे यांच्यासह समर्थ एंटरप्रायझेसच्या प्रिया थेटे, समर्थ एंटरप्रायझेसचे पार्टनर अनिरुद्ध थेटे, आयसीआयसीआय प्रोडेन्शीयलचे वाइस प्रेसिडेंट अभिजीत सरदेसाई, जिल्हा मातृशक्ती संयोजिका अस्मिता सरदेसाई, लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षा लायन शिल्पा पानवलकर, सचिव लायन संजय पटवर्धन, विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा अध्यक्षा उमा देवळे, कोषाध्यक्ष दीपक जोशी उपस्थित होते.



