स्वरनिनाद’च्या निरंजन तेंडुलकरचे तबला विशारद परीक्षेत यश

रत्नागिरी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या तबला विशारद परीक्षेत येथील स्वरनिनाद संगीत अकॅडमीचा विद्यार्थी निरंजन तेंडुलकर हा तबला विशारद परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. गुरुप्रसाद पटवर्धन, अथर्व घाणेकर, रोहित सागवेकर हे तीन विद्यार्थी उपांत्य विशारद परीक्षा उत्तीर्ण झाले. या सर्वांना गुरू केदार लिंगायत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मे महिन्यामध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती. निरंजन तेंडुलकरने प्राथमिक शिक्षणाचे धडे आठ वर्षे माधव साळसकर यांच्याकडे गिरवले असून, गेली सहा वर्षे तो केदार लिंगायत यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहे. गुरुप्रसाद पटवर्धन, अथर्व घाणेकर, रोहित सागवेकर हे उपांत्य विशारद परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचेही तबल्याचे सध्याचे शिक्षण श्री. लिंगायत यांच्याकडे सुरू आहे. याआधी स्वरनिनाद संगीत अकॅडमी आणि रियाज तबला अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी विशारद पूर्ण पदवी प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ‘स्वरनिनाद’चे श्री. लिंगायत यांनी त्यांचे कौतुक केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.



