मुख्य बातमी

राजवाडी-ब्राह्मणवाडीत मिळणार जंगली झाडांची रोपे

रत्नागिरी : कोकणात लागवड केल्या जाणाऱ्या आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम या फळझाडांबरोबरच इथली जैवविविधता आणि निसर्ग संपन्नता टिकवण्यासाठी जंगल वाढविले पाहिजे या हेतूने देवरूखच्या सामाजिक वनीकरण खात्याच्या सहकार्याने राजवाडी (ता. संगमेश्वर) येथे जंगली झाडे तीन वर्षांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच धर्तीवर यंदाही उत्तम प्रकारे जोपासलेली या झाडांची रोपे पुढील आठवड्यापासून राजवाडीत (ब्राह्मणवाडी) मिळणार आहेत.
एकीकडे बेसुमार वृक्षतोडीमुळे कोकण उजाड होत आहे. कोकणात लागवड करायची म्हटली की मुख्यत्वे आंबा, काजूला प्राधान्य दिले जाते. तसेच फणस, नारळ, कोकम यांचीच लागवड केली जाते. या फळझाडांची लागवड करतानाच इथली जैवविविधता आणि निसर्ग संपन्नता टिकवायची असेल, तर जंगलही जगवायला हवे आणि ते वाढवायला हवे, कारण या जंगलांच्या आधाराने विविध प्रकारचे पशु-पक्षी जगत असतात. आपल्या घराच्या आवारात आपण जंगल निर्माण करू शकणार नाही. पण जंगलातल्या निसर्गाचा हिस्सा असलेली दोन-पाच झाडे नक्की लावू शकतो. यामध्ये काही फळझाडेसुद्धा आहेत. अशा झाडांमुळे आपल्या परिसरात पक्ष्यांचा वावर वाढतो आणि बारमाही सावलीही मिळते.
या सर्व गोष्टींचा विचार करून अशा प्रकारची जंगली झाडे राजवाडीत उपलब्ध करून देण्याची योजना तीन वर्षांपूर्वी यशस्वीपणे राबवली होती. त्या धर्तीवर यंदाही वड, पिंपळ, चिंच, बहावा, बेहडा, करंज, नीव, ताम्हन, कांचन, आवळा, जंगली बदाम आणि साग या झाडांची रोपे रास्त दरात उपलब्ध करून देण्याची योजना यंदाही आखण्यात आली आहे. देवरूखच्या सामाजिक वनीकरण खात्याने उत्तम प्रकारे जोपासलेली या झाडांची रोपे पुढील आठवड्यापासून राजवाडीत (ब्राह्मणवाडी) मिळणार आहेत. देवरूखहून राजवाडीपर्यंतचा वाहतुकीचा खर्च पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट (पेम) या संस्थेतर्फे केला जाणार आहे. तसेच कोणतेही कमिशन न घेता वनीकरण खात्याने निश्चित केलेल्या दरानुसार (प्रत्येकी ५० रुपये) ती दिली जाणार आहेत. ही वेगळ्या प्रकारची रोपे असल्यामुळे मर्यादित प्रमाणात आहेत. कोकणातल्या निसर्ग जतन-संवर्धनात आपणही खारीचा वाटा उचलावा आणि इच्छुकांनी ९८६०८३७३९७ किंवा ७४९९८७४०५४ या क्रमांकावर आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button