निवळी-पालवण येथे १८३ गुंठे जागेत होणार दीड हजार वृक्षांची लागवड
कोकणातील सर्वात मोठ्या देवराई संवर्धन, जतनाचा पर्यावरणदिनी शुभारंभ

चिपळूण : तालुक्यातील निवळी-पालवण येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने निसर्गप्रेमी गुलाब सुर्वे यांच्या माध्यमातून कोकणातील सर्वात मोठ्या देवराई संवर्धन, जतनाचा शुभारंभ पर्यावरणदिनी करण्यात आला. या मोहिमेंतर्गत १८३ गुंठे जागेत १२५ प्रकारची दीड हजार झाडे जगविली जाणार आहेत. हा प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच राबवला जात आहे.
कोकणात अनेक गावांतून देवराई त्या-त्या गावातील ग्रामदेवतेच्या अंतर्गत येणाऱ्या जागेमध्ये वृक्षांचे जतन केले जाते. देवराईमधील वृक्षतोड करण्यास पूर्णपणे बंदी आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात नैसर्गिक आपत्तीसह अन्य काही कारणांमुळे कोकणातील देवराई अर्थात स्थानिक ग्राम देवस्थानअंतर्गत असलेली वृक्षसंपदा कमी होऊ लागली आहे. त्याचे परिणाम निसगांचे संतुलन बिघडण्यावर होत आहेत. अनेक वर्षे जतन करून ठेवलेल्या देवराईमधील दुर्मिळ वृक्षांचे अस्तित्वदेखील कालानुरूप संपत चालले आहे. अशा एकूणच घटना लक्षात घेता पुन्हा एकदा गावागावांतून देवराई बहरावी यासाठी निसर्ग पर्यावरणप्रेमींकडून पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निवळी, पंचायत समिती (चिपळूण) श्री पावणाई देवी मंदिर (बाराआणे) देवस्थान कमिटी, नाम फाउंडेशनच्या नाम वन संजीवन अभियानांतर्गत व रघुनाथ ढोले देवराई फाउंडेशन (पुणे) यांच्यासह निसर्ग व पर्यावरणप्रेमींकडून देवराई संवर्धन आणि वाढ हा उपक्रम निवळी येथे सुमारे १८३ गुंठे जागेत देवराईचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण दिनी या मोहिमेची वृक्ष लागवड करून सुरुवात करण्यात आली.
यावेळी निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सुर्वे, मानकरी अनंत सुर्वे, लक्ष्मण कोदारे, रावसाहेब सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, शरद शिगवण, गजानन लोकरे, सखाराम महाडिक, शरद शिगवण, सुभाष गुरव, आबा गोसावी, प्रवीण कोदारे, प्रताप सुर्वे, गजानन भुवड, अवि मोहिते, धीरज सुर्वे, राजेश सुर्वे, रवींद्र सुर्वे कृष्णा काजारे, पंचायत समिती कृषी अधिकारी बी. बी. पाटील, सामाजिक वनीकरण वनरक्षक अर्जुन जाधव, अशोक भुस्कुटे, अजित जोशी, जलदूत, नदी समन्वयक, नाम फाउंडेशनचे शाहनवाज शाह आदी उपस्थित होते. या वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



