मुख्य बातमीराजकीय

नीलेश राणेंचा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपने काबिज केल्यानंतर आता माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरही भाजपचा दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत मोठ्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कमळ चिन्हावर निवडणूक लढवली आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात ४८ हजार ८१५ चे मताधिक्य घेत निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला पोषक वातावरणनिर्मित झाली आहे. भाजपसह महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, त्यांनी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
अशातच नीतेश राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा करून ह्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल असे स्पष्ट संकेत दिले होते; मात्र नीलेश राणे यांनी “नीतेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे, तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार” असे विधान काल (५ जून) रात्री सोशल मीडियावर केले आहे. त्यांनी केलेल्या ह्या विधानामुळे रत्नागिरीतील महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गोटात अस्वस्थता पसरली आहे. येत्या काही महिन्यांत लागणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता रत्नागिरीत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, अशी चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button