मुख्य बातमी

धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नक्कीच काही ठोस कार्यक्रम आखू

धनेशमित्र संमेलनात उपवनसंक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी व्यक्त केला विश्वास

दोडामार्ग : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणावर धनेश पक्षी आढळून येतात; मात्र त्याबद्दल पुरेशी माहिती लोकांना नसते. या पक्ष्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी काही व्यक्ती आणि संस्था काम करत आहेत. आज या धनेशमित्र संमेलनाच्यानिमित्ताने अभ्यासक, संस्था आणि शासन म्हणजे वनविभाग हे एकत्र येऊन धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नक्कीच काही ठोस कार्यक्रम आखू शकू,” असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी व्यक्त केला.
धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशनच्या वतीने कोकणातील दुसरे धनेशमित्र संमेलन कुडासे येथील वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये नुकतेच आयोजित केले होते. या संमेलनाला श्री. रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासगी जागेतील वनांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. धनेश पक्षांच्या संवर्धनासाठी नैसर्गिक वनांचा ऱ्हास रोखणे, खासगी जागेवर धनेश पक्ष्यांसाठी पोषक असणाऱ्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खासगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असल्याचा ऊहापोह या संमेलनात करण्यात आला.

संमेलनाची सुरुवात ‘महा एमबीटी’ आणि ‘दी हॅबिटॅट्स ट्रस्ट’ निर्मित महाधनेश पक्ष्यावरील माहितीपटाच्या सादरीकरणाने झाली. यावेळी अक्षय मांडवकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वानोशी फॉरेस्ट होम स्टेचे प्रवीण देसाई यांनी स्वागत केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उपवनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्यासह देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले, नेचर कॉन्झर्वेशनचे वन्यजीव संशोधक डॉ. रोहित नानिवडेकर, सृष्टीज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे डॉ. शार्दुल केळकर उपस्थित होते.
सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील धनेश पक्षी संवर्धनाची माहिती दिली. डॉ. नानिवडेकर यांनी भारतातील धनेश पक्षी संवर्धनाचा ऊहापोह केला. धनेश पक्षी संशोधक पूजा पवार यांनी पश्चिम घाटातील धनेश पक्षी संशोधनाचा आढावा मांडला. संमेलनात धनेश पक्षी आणि इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्गमित्रांचा धनेशमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये वनश्री फाऊंडेशन, प्रवीण सातोसकर, प्रवीण देसाई, विशाल सडेकर, पराग रांगणेकर, भागयश्री परब, महादेव भिसे, गजानन शेट्ये, राहुल ठाकूर, वाइल्डवन तिलारी, मिलिंद पाटील यांचा समावेश आहे.
या संमेलनाला सृष्टीज्ञान संस्था, नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन, सह्याद्री संकल्प सोसायटी, देवराई फाऊंडेशन, ऑन दी एज कॉन्झर्वेशन, सिंधुदुर्गमधील वानोशी फॉरेस्ट होमस्टे आणि वनश्री फाऊंडेशन यांचे सहकार्य मिळाले आहे.
दरम्यान, सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे यांनी धनेश मित्र संमेलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. धोकाग्रस्त प्रजाती झालेल्या धनेश पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरू झालेल्या धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि धनेशमित्र संमेलन या दोन्ही उपक्रमांना कोकणात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे बघून खूपच समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि गोवा अश्या ठिकाणांहून निसर्गप्रेमी आणि संवर्धक यांची उपस्थिती, मार्गदर्शन आणि सहभाग लाभत आहे. संमेलनात मांडलेले मुद्दे आणि उपाययोजना यांचे एकत्रीकरण करून संवर्धन आराखडा लवकरच बनवून आणि तो वनविभाग, धोरणकर्ते, शासन आणि प्रशासन यांच्यासमोर मांडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button