मुख्य बातमी

कोकणातील दुसरे धनेशमित्र संमेलन २ जूनला दोडामार्गला

रत्नागिरी : संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट झालेला धनेश पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या धनेशमित्र निसर्ग मंडळाच्या वतीने कोकणातील दुसरे धनेशमित्र संमेलन कुडासे, दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे २ जूनला आयोजित केले आहे. कुडासे येथील वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत या वेळेत हे संमेलन होईल.
जंगलतोड आणि हवामान बदलामुळे धनेश पक्षी संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या पक्षाचे आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन धनेशमित्र निसर्ग मंडळाची स्थापना केली आहे. देवरूखमधील सह्याद्री संकल्प सोसायटी ही नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन बंगलोर या संस्थेतील संशोधकांच्या साहाय्याने रत्नागिरी जिल्ह्यात धनेश पक्ष्यावर संशोधन आणि जनजागृतीचे काम करत आहे. विशेष करून धनेश पक्ष्यांचे अधिवास संवर्धित करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्या संकल्पनेतून यापूर्वी देवरूख (ता. संगमेश्वर) येथे पहिले संमेलन मार्च महिन्यात झाले होते. या संमेलनात कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्यांच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेत धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असल्याचे मांडण्यात आले होते.
देवरूख येथील धनेश मित्र संमेलन यशस्वीरित्या आयोजित केल्यानंतर सह्याद्री आणि कोकणातील धनेश पक्षी आणि त्यांच्या अधीवसाच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन त्यांच्या संवर्धनाची दिशा ठरविण्यासाठी दुसरे धनेशमित्र मित्र संमेलन दोडामार्ग येथे २ जूनला दोडामार्ग येथे आयोजित केले आहे.
या संमेलनाला सृष्टीज्ञान संस्था, नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन, सह्याद्री संकल्प सोसायटी, देवराई फाऊंडेशन, ऑन दी एज कॉन्झर्वेशन, सिंधुदुर्गमधील वानोशी फॉरेस्ट होमस्टे आणि वनश्री फाऊंडेशन यांचे सहकार्य मिळाले आहे. अधिक माहितीसाठी प्रतीक मोरे (७७९८२३३२४३) आणि प्रवीण देसाई (९४०५८३३६९१) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button