मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जेएसडब्लू जेटीचे काम थांबवले

सडेवाडी, परकोटवाडी भागातील स्थानिक मच्छीमारांमधून समाधान

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्लू पोर्टने सुरू केलेल्या जेटीचे काम अखेर पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार थांबवण्यात आले आहे. स्थानिक मच्छिमारांविरोधात दुटप्पी भूमिका घेणाऱ्या जेएसडब्ल्यूला नमते घ्यावे लागल्यामुळे सडेवाडी, परकोटवाडी भागांतील स्थानिक मच्छीमारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीच्या मनमानी कारभारास आळा घालण्यासाठी सडेवाडी, परकोटवाडी येथील पारंपरिक स्थानिक मच्छीमारांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री आमदार उदय सामंत यांना साकडे घातले होते. लेखी निवेदन देवून अन्यायाविरोधात दादही मागितली होती. स्थानिकांच्या या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी तातडीने जयगड येथे भेट घेऊन निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत आढावा घेतला. जेएसडब्लू पोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांची गळचेपी करून प्रशासनाचीसुद्धा दिशाभूल केली होती. कंपनीने जाचक बाँड पेपर करून घेतले होते. त्याची पोलखोल पालकमंत्र्यांनी जागच्या जागीच केली. भोळ्याभाबड्या स्थानिक, पारंपरिक मच्छीमारांना कायद्याचा खोटा बडगा दाखवून मनमानीपणा करणाऱ्या जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीच्या जनसंपर्क अधिकारी, कायदेशीर सल्लागार यांना सज्जड दम दिला. सडेवाडी ग्रामस्थांच्या पारंपरिक श्रीगणेश विसर्जन घाटाबद्दल दुराग्रही भूमिका घेणाऱ्या कंपनीचे चुकीच्या पद्धतीने चालवलेले जेटीचे काम तात्काळ थांबविण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी दिले. स्थानिक मच्छीमारांचे सर्व प्रश्न ठरल्याप्रमाणे सुटेपर्यंत जेट्टीचे काम थांबविण्यात आले आहे. पालकमंत्री सामंत यांच्या या लोकाभिमुख निर्णयामुळे उपस्थित सडेवाडी, परकोटवाडी भागांतील स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले आहे.

कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारविरोधात गेले सुमारे ११ वर्षे नेटाने आंदोलन सुरू ठेवणारे आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रमोद प्रभाकर घाटगे,विकास कमलाकर निंबाळकर यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button