मुख्य बातमी

रत्नागिरीकरांनी केला मांडवी समुद्रकिनारा स्वच्छ

रत्नागिरी : रविवारची मस्त सुट्टी छान पैकी उशिरा उठून मस्त काहीतरी चटपटीत नाश्ता करून दिवसाची सुरुवात करता आलीच असती तरीसुध्दा..’आपली मांडवी स्वच्छ मांडवी’ या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी एकत्र आले. आज (२६ मे) सकाळी जेवढं जमेल त्या प्रमाणात कचरा एकत्र करून मांडवी समुद्र किनारा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.

पसरलेला कचरा गोळा करताना रत्नागिरीचे जागरूक नागरिक

सध्या रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. मांडवी समुद्रकिनारी स्थानिकांबरोबरच पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. संध्याकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे किनाऱ्यावर कचरा टाकण्याचे प्रकारही घडत आहेत. आईस्क्रीमचे, चिप्सचे रॅपर्स, उकडलेल्या शेंगा खाल्ल्यानंतर टाकल्या जाणाऱ्या कागदाचा कचरा, तसेच शेंगांची टरफले, खाऊन टाकलेली कणसे आदींचा कचरा किनाऱ्यावर पसरलेला दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन काल (२५ मे) सोशल मीडियावर “आपली मांडवी स्वच्छ मांडवी”साठी रत्नागिरीकरांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला रत्नगिरीकरांनी प्रतिसाद दिला. जवळपास ४० जणांनी एकत्र येत समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविली.

स्वच्छता केल्यानंतर सुंदर दिसणारा मांडवीचा किनारा

रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना अस्वच्छतेचे दर्शन घडू नये यासाठी रत्नागिरीकरांनी पुढाकार घेऊन आज सकाळी ७ वाजता मांडवी समुद्र किनारा हजेरी लावत ९ वाजेपर्यंत किनाऱ्याची साफसफाई केली. यासाठी रत्नागिरीतील जागरूक नागरिक सुहास ठाकूरदेसाई, अश्विनी वाटवे, श्रीकांत मराठे, संजय वैश्यंपायन, संजय आठल्ये, अरुण कीर, गौरांग आगाशे, गुरुदेव नांदगावकर, स्वप्नील सावंत, रिना सुर्वे, शरद शिवलकर, गितेश जामसंडेकर, सुहास जोशी, जयदीप शिंदे, साई राजिवडेकर, महेंद्र पराडकर यांच्यासह अनेकजणांनी एकत्र येत किनारा स्वच्छ केला.

सहकाऱ्यांसमवेत रत्नागिरीतील तरुण उद्योजक गौरांग आगाशे (डावीकडून दुसरे)

याविषयी बोलताना रत्नागिरीतील तरुण उद्योजक आणि “अनबॉक्स”चे गौरांग आगाशे म्हणाले, “रत्नागिरीत खरंच पर्यटक यायला हवे असतील आणि परत परत त्यांनी आपल्या रत्नागिरीच नाव घ्यायला हवं असेल, तर आपण आपली रत्नागिरी स्वच्छ ठेवलीच पाहिजे. त्यातूनच पर्यटन वाढून व्यवसायिकांना चालना मिळेल आणि आपला सर्व स्तरातून विकास होईल. प्रत्येक नागरिकाने ठरवले तर नक्कीच हे कठीण नाही.”
जे रत्नागिरीकर आज ‘स्वच्छ मांडवी’साठी एकत्र आले होते त्यांचे मनापासून आभार मानत आपले योगदान अमूल्य असल्याचे श्री. आगाशे यांनी नमूद केले.

दरम्यान, ह्या गोळा केलेल्या कचऱ्याचे पर्यावरणपूरक कचरा आणि प्लास्टिक अशा दोन भागात विभागणी करून प्लास्टिक कचरा “अनबॉक्स”मार्फत चालवल्या जाणाऱ्या रिसायकल प्लांटमध्ये नेण्यात आला. यावर प्रक्रिया करून हे प्लास्टिक पुनर्वापरात आणले जाईल असेही श्री. आगाशे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button