संकष्टीनिमित्त गणपतीपुळ्यात भविकांची अभूतपूर्व गर्दी
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान प्रशासन सज्ज

रत्नागिरी : तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे संकष्टी चतुर्थीनिमित्ताने भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे. आज पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी गणपतीपुळे देवस्थान प्रयत्नशील असून, भाविकांची चोख व्यवस्था केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होणारा गणपतीपुळ्यातील पर्यटन हंगाम यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संथ गतीने सुरू होता. त्यामुळे येथील व्यावसायिक चिंतेत होते; मात्र ७ मे रोजी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडल्यानंतर येथे पर्यटन व्यवसाय बहरण्यास सुरुवात झाली. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती श्री क्षेत्र गणपतीपुळे असल्याने हळूहळू पर्यटकांची पावले याठिकाणी वळू लागली. गेले काही दिवस येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने येथील व्यावसायिकांमध्येही समाधान पसरले आहे.

आज असलेल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. श्रींचे दर्शन मिळावे यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. दर्शनासाठी उभे राहण्यासाठी सोय असलेल्या आतील सर्व रांगा पूर्ण भरल्या असून बाहेरच्या बाजूला असलेल्या तीन रांगाही भाविकांच्या गर्दीने भरल्या आहेत. आज गणपतीपुळे देवस्थान परिसरात अंगारकीसारखी स्थिती असल्याचे चित्र आहे. भाविकांसाठी गणपतीपुळे देवस्थान प्रशासन सज्ज असून, त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान प्रशासन प्रयत्नशील आहे.



