चिपळूणमध्ये जंगली प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप

रत्नागिरी : चिपळूण येथील श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट आणि विघ्नहर्ता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जंगली प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप तसेच विघ्नहर्ता रोपवाटिकेमधील कोणत्याही खरेदीवर २५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.
सध्या कोकणासह संपूर्ण देश उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघाला आहे. भविष्यातील काळ तापमानवाढीच्या दृष्टीने याहून कठीण असणार आहे, याची जाणीव ठेवून २०१९ पासून चिपळूणच्या विघ्नहर्ता ग्रुपतर्फे प्रतिवर्षी मोफत झाडे वाटप केले जात आहे. लोकांनी जास्तीत जास्त झाडे लावावीत, ती जगवावीत आणि आपल्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी हाच मागचा हेतू आहे.
एका कुटुंबाला जास्तीत जास्त ५ आणि संस्थेला जास्तीत जास्त २० झाडे मोफत दिली जातील. ही झाडे लावून त्यांना जगवावे हीच अपेक्षा आहे, विघ्नहर्ता ग्रुपच्या व्यक्त केली आहे.
विघ्नहर्ता ग्रुपच्या वर्धापनदिनानिमित्त १ जून रोजी सांयकाळी ५ वाजता श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिर (चिपळूण) येथे जंगली प्रजातीच्या वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, आवळा, चिंच, जांभूळ, सीताफळ, बहावा, आपटा, ताम्हण, कांचन, रायवळ आंबा, फणस, कदंब, सोनचाफा, शंकासूर, कण्हेर, शेवर आदी झाडांच्या रोपांचे मोफत वाटप केले जाणार आहे. तसेच विघ्नहर्ता रोपवाटिकेमधील फुलझाडे, शोभिवंत झाडे, खते, कुंड्या या सर्व खरेदीवर २५ टक्के सूट देण्यात येणार आहे.
दि.१ जून ते १५ जून या कालावधी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत झाडे मिळणार असून, रोपवाटिकेमधील विक्रीवर २५ टक्के सूट दिली जाणार आहे.
मोफत झाडांच्या नोंदणीसाठी विनायक शेडगे (९६५७२४५६७२) यांच्याशी संपर्क साधावा.



